यवतमाळ विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हा समन्वयक तथा पुसेद-यवतमाळ जिल्ह्यातील पक्षाचे सक्रिय नेते नितीन कांचन सुरेशचंद्र भुतडा यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे.महायुती धर्माचे पालन करत वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशाला प्राधान्य देत आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जाहीर प्रसिद्धीपत्रकाद्वारे भुतडा यांनी सांगितले की, यवतमाळ जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष अधिक मजबूत व्हावा आणि विधान परिषदेची जागा भाजपला मिळावी, अशी कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा होती. मात्र महायुतीतील जागावाटपानुसार ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने पक्षनिष्ठेला सर्वोच्च स्थान देत त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच आमदार मदन येरावार यांच्या आदेशाला आपण अंतिम मानत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भुतडा यांनी आपल्या संदेशात कार्यकर्ते, सहकारी आणि जनतेचे आभार मानत, निवडणूक न लढविली तरी भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी आपले कार्य अविरत सुरू राहील, अशी ग्वाही दिली. कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रेम, विश्वास आणि पाठबळामुळेच आपण आजवरची वाटचाल करू शकलो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
महायुतीतील समन्वय आणि पक्षशिस्तीचे उदाहरण म्हणून नितीन भुतडा यांच्या या निर्णयाकडे राजकीय वर्तुळात पाहिले जात असून,त्यांच्या भूमिकेची जिल्हाभरात चर्चा सुरू आहे.