गुप्तधनातील सोन्याच्या नाण्यांचे आमिष ; बनावट पोलीस बनून अकरा लाखांची फसवणूक उघड स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; मुख्य आरोपी अटकेत, दोन लाख पाच लाखांची रोकड जप्त

लोकवेध न्यूज नेटवर्क / १७ मे.

 

 महागाव :- 

 

महागाव पोलीस स्टेशन हद्दीत कमी किमतीत गुप्तधनातील सोन्याची नाणी देण्याचे आमिष दाखवत तसेच काही आरोपींनी स्वतःला पोलीस असल्याचा बनाव करून तब्बल १० लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे.या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून फसवणुकीतील २ लाख ५ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

 

याबाबत स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप रामचंद्र खोब्रागडे (वय ३३, रा. गोकुळ नगर बायपास, आयटीआय चौक, गडचिरोली) यांना अज्ञात इसमांनी संगनमत करून कमी किमतीत गुप्तधनातील सोन्याची नाणी देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांना महागाव तालुक्यातील दहीसावली परिसरात बोलावून रोख १० लाख ८० हजार रुपये घेतले. दरम्यान, काही आरोपींनी बनावट पोलीस बनून अचानक घटनास्थळी धाड टाकल्याचा आव आणला. त्यामुळे फिर्यादी घाबरून तेथून पळून गेले. याच संधीचा फायदा घेत आरोपींनी संपूर्ण रक्कम घेऊन पलायन केले.

या प्रकरणी महागाव पोलीस स्टेशनमध्ये अप. क्र. २१६/२०२६ अन्वये कलम ३१८ (४), ३(५) भा.न्या.सं. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भा.पो.से.) यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान पिंपळगाव येथील विठ्ठल पांडुरंग पवार व त्याच्या साथीदारांनी हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पथकाने पिंपळगाव येथे सापळा रचून आरोपी विठ्ठल पांडुरंग पवार (वय ३४, रा. पिंपळगाव ता. पुसद, जि. यवतमाळ) याला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने इतर सात साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली.

आरोपींकडून फसवणुकीतील २ लाख ५ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून पुढील तपासासाठी आरोपीला महागाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता,अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात,उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे व महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनराज निळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या