मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेला वेग; हनुमान मंदिरातील बीएलओ कॅम्पला नागरिकांचा मोठा प्रतिसाद”

लोकवेध न्यूज नेटवर्क / ०७ मार्च
महागाव :-
महागाव येथे मतदार यादीच्या विशेष पुनर्निरीक्षण (एस.आय.आर.) मोहिमेला गती देण्यासाठी मंगळवार, दि. ०७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता हनुमान मंदिर परिसरात बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) कॅम्प आयोजित करण्यात आला. या कॅम्पला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
कॅम्पमध्ये मतदारांना आपली नावे तपासणे, आवश्यक दुरुस्ती करणे, नवीन नोंदणी करणे तसेच इतर बदल करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. अनेक नागरिकांनी मतदान ओळखपत्रासह उपस्थित राहून प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला.
यावेळी नगरसेविका सौ. जयश्री संजय नरवाडे यांनी नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. अचूक व अद्ययावत मतदार यादी तयार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे सहकार्य अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराची नोंद अचूक असणे गरजेचे असून, नागरिकांनी अशा उपक्रमांचा लाभ घेत वेळेत नोंदणी व दुरुस्ती पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

