पत्रकार परिषदेत दारूमुक्तीचा बिगुल; १६ एप्रिलला ‘आडवी बाटली’ जिंकवण्यासाठी महिलांना थेट आवाहन !

लोकवेध न्यूज नेटवर्क / ०८ एप्रिल
महागाव :-
प्रभाग क्रमांक १ मधील देशी दारू दुकान व वाईन बार कायमस्वरूपी बंद करण्याच्या प्रश्नावर आयोजित पत्रकार परिषदेत दारूमुक्तीचा ठाम बिगुल वाजवण्यात आला. नगरविकास आघाडीचे तेरा नगरसेवक या भूमिकेसाठी सज्ज झाले असून, १६ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानात महिला मतदारांनी ‘आडवी बाटली’ या पर्यायाला मोठ्या प्रमाणावर मतदान करावे, असे थेट आवाहन करण्यात आले असून यासाठी आम्ही दस्तुरखुद आडव्या बाटलीला मतदान करून घेण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगण्यात आले.
पत्रकार परिषदेत नगराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत, “हे मतदान केवळ औपचारिकता नसून समाजाच्या भवितव्याचा निर्णय आहे. दारूमुळे कुटुंबांवर होणारे दुष्परिणाम थांबवण्यासाठी महिलांनी निर्णायक भूमिका घ्यावी, असे सांगितले.
या,आंदोलनाची धुरा नगरसेविका सौ. जयश्री संजय नरवाडे यांनी हाती घेतली आहे. त्यांनी सांगितले की, प्रभागातील महिला व शाळकरी मुलींना होणारा त्रास लक्षात घेऊनच हा लढा उभा केला आहे. यात माझा कोणताही वैयक्तिक हेतू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्ष सौ. रंजना दीपक आडे यांनीही ठाम पाठिंबा दर्शवत, “हा लढा कुण्या एकट्याचा नसून संपूर्ण महागावचा आहे. आपले सर्व सहकारी नगरसेवक एकत्र येऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत,असे स्पष्ट केले.
माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक सुरेश पाटील नरवाडे यांनी विषयाची सविस्तर माहिती दिली. यावेळी नगराध्यक्ष सौ. रंजना आडे, उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे,जेष्ठ नेते तथा नगरसेवक रामराव पाटील नरवाडे, सुरेश पाटील नरवाडे,विशाल पांडे, परवेज सुरैया, सौ. जयश्री नरवाडे, जयश्री इंगोले, सुनीता डाखोरे, गजानन साबळे आदी उपस्थित होते.
–———————————————————————
दरम्यान,माजी अर्थ व बांधकाम सभापती तथा नगरसेवक गजानन साबळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत,वाईन बार बंद करण्याच्या मतदानात माझा सहभाग नाही; मात्र देशी दारू दुकान बंद करण्यासाठी ‘आडवी बाटली’ला मत देण्याच्या मताचा मी आहे,असे जाहीर केले.
एकंदरीत,पत्रकार परिषदेतून दारूमुक्तीच्या लढ्याला धार मिळाली असून,आडवी बाटली की उभी बाटली’ या निर्णयाकडे आता संपूर्ण महागावचे लक्षलागले आहे.
