वन डे सर्व्हिसमुळे प्रशासन दारात; कासोळा शिबिरात नागरिकांचा विश्वास दृढ” मनीष जाधव यांचा विश्वास

लोकवेध न्यूज नेटवर्क / ०१ एप्रिल 

महागाव :- 

 

तालुक्यातील कासोळा महसूल मंडळ येथे महसूल विभागाच्या वतीने आयोजित “छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर” उत्साहात व मोठ्या प्रतिसादात पार पडले. “शासन आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत झालेल्या या शिबिरामुळे नागरिकांच्या अनेक प्रलंबित कामांना गती मिळाली.

शिबिराच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अभय मस्के होते.प्रमुख उपस्थितीमध्ये नगराध्यक्ष मोहिनीताई नाईक, शेतकरी नेते मनीष जाधव,गटविकास अधिकारी दत्तराव कदम, नायब तहसीलदार गजानन पराते,मंडळ अधिकारी संजय वैद्य,संदीप मानकर, गोविंद ठाकरे,दीपक चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्ष मोहिनीताई नाईक यांनी “शासन आपल्या दारी हा उपक्रम सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, दिव्यांग बांधव व विविध योजनांच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगत जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

शेतकरी नेते मनीष जाधव यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर भाष्य करताना सांगितले की,प्रशासन हे कार्यतत्पर, लोकाभिमुख आणि शोषणमुक्त असणे गरजेचे आहे. तेव्हाच छत्रपती शिवरायांच्या संकल्पनेतील रयतेचे राज्य साकार होईल.

 

दरम्यान त्यांनी दिव्यांग बांधवांबाबत घडलेल्या अलीकडील घटनेवर नाराजी व्यक्त करत अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी केली.तसेच तहसीलदार अभय मस्के यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत त्यांच्या नेतृत्वामुळे महसूल विभागात सकारात्मक बदल झाल्याचे त्यांनी नमूद केले.

शिबिरादरम्यान महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ व ८-अ उताऱ्यांतील त्रुटी दुरुस्ती, अभिलेख दुरुस्ती यासह उत्पन्न, रहिवासी, जात व क्रीमीलेअर प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. तसेच अन्न व पुरवठा विभागाच्या कुपनांचेही वितरण करण्यात आले.

वन डे सर्व्हिस संकल्पनेमुळे अनेक नागरिकांची कामे त्याच दिवशी पूर्ण झाल्याने शिबिरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाच्या समन्वयातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांची कामे मार्गी लागल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले.

अध्यक्षीय भाषणात तहसीलदार अभय मस्के यांनी शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. शासनाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या समस्या तात्काळ सोडविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या शिबिरामुळे शासनाच्या सेवा अधिक वेगाने, पारदर्शक व लोकाभिमुख पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या