वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा; संतप्त नागरिकांचा महावितरणवर मोर्चा ,१५ दिवसांत तोडगा देण्याचे आश्वासन !
कोलवेध न्यूज नेटवर्क / ३१ मार्च
उमरखेड :-
शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वीज समस्येमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज थेट महावितरण कार्यालयात धडक देत प्रशासनाला जाब विचारला. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, वाढता लोड, अपुरी डीपी व्यवस्था आणि तक्रार निवारणातील दिरंगाई यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
सर्व समस्या निराकरण समाधान ग्रुपच्या पुढाकारातून काही नगरसेवक व नागरिकांनी महावितरणचे कार्यकारी उपअभियंता प्रशांत अंबाडकर यांची भेट घेत सविस्तर निवेदन सादर केले. शहरातील वाढत्या वीज समस्येचा आढावा घेत सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी अंबाडकर यांनी नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेत लवकरात लवकर समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. तसेच, पुढील १५ दिवसांत झालेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी पुन्हा बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक वॉर्डनुसार व डीपीनुसार संबंधित कर्मचाऱ्यांची नावे व संपर्क क्रमांक नागरिकांना देण्यात येणार असून, ग्राहकांशी सुसंवाद राखण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहेत.
दरम्यान, शहरासाठी मंजूर असलेल्या नवीन डीपींसाठी निधी लवकर मिळावा यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार आहे. यासाठी आमदार किसन वानखेडे यांच्याकडेही निधीसाठी मागणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
या चर्चासत्रात नगरपरिषदेचे सहा नगरसेवक तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. शेवटी, नागरिकांनी एकत्रित प्रयत्नातूनच समस्यांवर मात करता येईल, असा विश्वास व्यक्त करत सहकार्य कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

