इंधन तुटवड्याची धांदल; उमरखेडकर रांगेत, प्रशासनावर सवाल 

लोकवेध न्यूज नेटवर्क / २५ मार्च 

 

उमरखेड :- 

 

उमरखेड शहरात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांचे हाल होत असून, संपूर्ण शहरात एकप्रकारे धांदल उडाल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, इंधन मिळवण्यासाठी नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंधन पुरवठ्यात अचानक खंड पडल्याने अनेक पंपांवरील साठा झपाट्याने कमी झाला आहे. काही ठिकाणी तर पेट्रोल-डिझेल पूर्णपणे संपल्याने पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, या तुटवड्याचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावर होत असून, शेतकरी, व्यापारी तसेच नोकरदार वर्ग अडचणीत सापडला आहे. वाहतूक व्यवस्थाही काही प्रमाणात विस्कळीत झाली असून, अनेकांची कामे रखडली आहेत.

या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देत प्रशासनाने तात्काळ पावले उचलून इंधन पुरवठा सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच, अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी साठेबाजी टाळावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या