सामाजिक संवेदनशीलता, सहकार्याची भावना आणि समावेशक शिक्षणाचा दृष्टिकोन अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने IIT HOME, रामदासपेठ, नागपूर येथील सुमारे १५० विद्यार्थ्यांनी संज्ञा संवर्धन संस्था संचालित कल्पतरू विशेष शाळा, बुटीबोरी येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विशेष मुलांचे शिक्षण, त्यांचा कौशल्यविकास आणि सर्वांगीण प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची जवळून माहिती घेण्याची संधी मिळाली.
या भेटीदरम्यान IIT HOME च्या विद्यार्थ्यांना गटानुसार शाळेतील विविध वर्गांची पाहणी घडवून आणण्यात आली. प्रत्येक वर्गात विशेष मुलांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक पद्धती, कौशल्यविकासाचे उपक्रम तसेच दैनंदिन जीवनात स्वावलंबी होण्यासाठी दिले जाणारे प्रशिक्षण याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही विशेष मुलांच्या क्षमता, त्यांची शिकण्याची पद्धत आणि त्यांच्या प्रगतीसाठी शिक्षकांकडून घेतले जाणारे परिश्रम याविषयी विशेष उत्सुकता दाखविली.
विशेष मुलांच्या जीवनातील आव्हाने समजून घेत त्यांच्याप्रती संवेदनशीलता, आपुलकी आणि सहकार्याची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. केवळ शैक्षणिक ज्ञान न घेता सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे मूल्य आत्मसात करण्याची प्रेरणा या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाली. त्यामुळे ही सदिच्छा भेट विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी अनुभव ठरली असून सदर कार्यक्रम हा 31 ऑक्टोंबर रोजी पार पडला.याप्रसंगी संज्ञा संवर्धन संस्थेचे सचिव डॉ. राजेश्वर उत्तरवार आणि संस्थेच्या ट्रस्टी सौ. हिमगोरी देशपांडे मॅडम उपस्थित होते.कल्पतरू विशेष शाळेच्या वतीने IIT HOME येथून आलेल्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे आत्मीयतेने स्वागत करण्यात आले. तसेच या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.