मुडाणा पीएमश्री शाळेत मुदतबाह्य खाद्यसाहित्याचा प्रचंड साठा! शाळेमागील नाल्यात शेकडो मसाल्यांची पाकिटे  पंचनामा करून साहित्य ताब्यात विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनासाठी वापरल्या जाणाऱ्या खाद्यसाहित्याच्या गुणवत्तेचा गंभीर प्रश्न 

लोकवेध न्यूज नेटवर्क / ०३ नोव्हेंबर.

महागाव:-

मुडाणा येथील पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेत ऐरणीवर आला आहे. लोकवेध ने काल बातमी प्रकाशित करून मुडाणा पीएमश्री शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाला मुदतबाह्य तेलाची फोडणी देण्यात येत असल्याच्या खळबळ जनक प्रकरणाचा भंडाफोड केला होता. लोकचिंतन च्या बातमीची दखल घेत जिल्हा शिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार यांनी तातडीने चौकशी समिती गठीत केली. या समितीत महागाव येथील प्रभारी गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे, विस्तार अधिकारी विजय बेतेवाड आणि शालेय पोषण आहार अधिकारी अमोल राठोड यांचा समावेश आहे.काल दिनांक २ नोव्हेंबर रोजी झालेल्या चौकशीदरम्यान शाळेच्या पाठीमागील नाल्याजवळ मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य मसाले व हळद पावडर ची पाकीटे आढळून आली. चौकशी समितीने या साहित्याची पाहणी करून पंचनामा केला आहे. विशेष म्हणजे,आढळलेल्या साहित्यामध्ये शेकडो पाकिटे मुदत संपलेली असल्याचे पंचनाम्यात नमूद असल्याने मध्यान्ह भोजनासाठी खाद्यसाहित्याची खरेदी, साठवणूक, वापर आणि विल्हेवाट या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

———————————————————————-

 

पालकांच्या तक्रारीनंतर चौकशी

 

३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या पालक सभेदरम्यान मध्यान्ह भोजनासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची पाहणी करण्यात आली होती. यावेळी ‘दीप प्रभा रिफाइंड सोयाबीन ऑइल’ची मुदत संपल्याचे निदर्शनास आल्याचा दावा पालकांनी केला होता. तसेच डाळींमध्ये किड, उंदराने कुरतडलेल्या सोयाबीन वड्या आणि हरभऱ्याला किड लागल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या. या प्रकाराची गंभीर दखल घेत पालकांनी पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन चौकशी व कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर २ नोव्हेंबर रोजी चौकशी समितीने शाळेत प्रत्यक्ष पाहणी केली.

———————————————————————-

नाल्याजवळ शेकडो पाकिटे

 

चौकशीदरम्यान शाळेच्या कार्यालयामागील बाजूस असलेल्या ओढ्याच्या काठाजवळ मुदतबाह्य खाद्यसाहित्याचा मोठा साठा आढळून आला. 

यात कांदा-लसूण मसाला, १०० ग्रॅम ची १७६ पाकिटे, उत्पादन जून २०२५, मुदत नोव्हेंबर २०२५. कांदा-लसूण मसाला, १०० ग्रॅम — १३४ पाकिटे, उत्पादन मार्च २०२५; मुदत ऑगस्ट २०२५. कांदा-लसूण मसाला, १०० ग्रॅम — १०९ पाकिटे, उत्पादन जानेवारी २०२५; मुदत जून २०२५. कांदा-लसूण मसाला, १०० ग्रॅम — १९७ पाकिटे, उत्पादन नोव्हेंबर २०२४; मुदत एप्रिल २०२५. हळद पावडर, २०० ग्रॅम — ११ पाकिटे, उत्पादन मार्च २०२५; मुदत फेब्रुवारी २०२६.

या सर्व साहित्याची मुदत चौकशीच्या तारखेपूर्वीच संपलेली असल्याचे आढळले असून हेच मुदतबाह्य साहित्य निरागस विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात वापरले जात असल्याचे अधोरेखित होत आहे.

———————————————————————-

शाळेचे खाद्यसाहित्य नाल्यात कसे पोहोचले ?

 

मुदतबाह्य खाद्यसाहित्य शाळेच्या परिसरातील नाल्याजवळ आढळल्याने ते तेथे कोणी, केव्हा आणि कोणत्या कारणासाठी नेऊन टाकले, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालकांकडून हे साहित्य कारवाई टाळण्यासाठी किंवा पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने फेकण्यात आले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

त्यामुळे या साहित्याचा मूळ साठा कुठून आला, त्याची शाळेत नोंद होती का,तो मध्यान्ह भोजनासाठी वापरला गेला होता का,मुदत संपल्यानंतरही तो शाळेत का ठेवण्यात आला आणि नंतर नाल्याजवळ तो कोणी टाकला,याची संपूर्ण शहनिशा करून दोषी लोकांवर कारवाई करावी अशी पालकांची मागणी आहे.

———————————————————————-

 

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

 

मध्यान्ह भोजन ही विद्यार्थ्यांच्या पोषणाशी थेट संबंधित योजना आहे. त्यामुळे मुदतबाह्य किंवा निकृष्ट खाद्यसाहित्याचा वापर झाला असल्यास तो केवळ प्रशासकीय त्रुटीचा विषय न राहता विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर बाब ठरते. पालकांनी उपस्थित केलेल्या तक्रारी आणि त्यानंतर चौकशीत आढळलेला मुदतबाह्य साहित्याचा साठा यामुळे शाळेतील मध्यान्ह भोजन व्यवस्थापन, खाद्यसाहित्याची तपासणी, साठवणूक आणि वितरण यंत्रणेची स्वतंत्रपणे तपासणी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

———————————————————————-

 

मुख्याध्यापकांच्या गलथान कारभाराची चौकशी करा !

 

या प्रकरणात शाळेतील खाद्यसाहित्याची जबाबदारी कोणाची होती,साहित्याची नियमित तपासणी झाली होती का,मुदत संपलेल्या वस्तूंची नोंद करण्यात आली होती का आणि त्यांची विल्हेवाट कोणाच्या आदेशाने लावण्यात आली,याची वस्तुनिष्ठ तपासणी करणे गरजेचे आहे.पालकांनी शाळा प्रशासनाकडून समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचा आरोप केला असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे.प्रभारी गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे यांच्या कार्यकाळातील या प्रकरणासह तालुक्यातील मध्यान्ह भोजन व्यवस्थेची व्यापक तपासणी करण्याची मागणी पुढे येत आहे.महत्वाचे म्हणजे ज्यांच्या कार्यकाळात हा गंभीर प्रकार उघडकीस आला तेच प्रभारी गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे चौकशी समितीचे सदस्य असल्यामुळे चौकशीच्या सोपस्काराबद्दल पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

———————————————————————

केवळ चौकशी नको, कारवाई करा

 

मुदतबाह्य खाद्यसाहित्य आढळल्याची बाब चौकशीच्या नोंदीत आली असल्यास त्याची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. साहित्याची खरेदी कोणी केली, साठा कोणी स्वीकारला, त्याची तपासणी कोणी केली आणि मुदत संपल्यानंतर त्याची विल्हेवाट कोणत्या पद्धतीने लावण्यात आली, याचा संपूर्ण तपशील तपासला जाणे आवश्यक आहे. चौकशी अहवालात दोष आढळल्यास संबंधितांवर विभागीय तसेच लागू कायद्यानुसार कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाची गुणवत्ता व सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान शिक्षणाधिकारी कोंडावार यांना संपर्क साधला असता चौकशी समितीचा अहवाल येताच ठोस कारवाई करू असे त्यांनी सांगितले.

———————————————————————-

चौकशीवेळी ग्रामस्थांची उपस्थिती

 

पंचनामा करताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू मारोती भानेगावकर, ज्ञानेश्वर रमेश पानपट्टे, विजय यशवंत बरडे, प्रवीण तुकाराम चव्हाण, कपिल सुभाष जाधव, आफरोज लालखान पठाण, नामदेव मारोती वाघमारे, बंडू माधवराव गायकवाड, यांच्यासह ग्रामस्थ व पालक उपस्थित असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या