महाराजस्व समाधान शिबिर’ महागावात; नागरिकांनी लाभ घ्यावा ;उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांचे आवाहन

लोकवेध न्यूज नेटवर्क / ०६ फेब्रुवारी
महागाव : –
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर ,टप्पा १’ या विशेष अभियानांतर्गत महागाव तालुक्यात मंडळनिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल व विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय महसूल अधिकारी सखाराम मुळे यांनी केले आहे.
या शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ व ८-अ मधील त्रुटी दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे उतारे, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेयर दाखले तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले देण्यात येणार आहेत. जमीन अभिलेख अद्ययावत करणे, अकृषिक (NA) प्रकरणांबाबत मार्गदर्शन, नवीन व्यवस्थापन सनद प्रक्रियेची माहिती, तुकडबंदी उल्लंघन प्रकरणांचा निपटारा, भूसंपादन व अकृषिक परवानगीसंदर्भातील ‘कमी-जास्त पत्रके’ तयार करून गाव दप्तर अद्ययावत करण्याची कार्यवाही शिबिरात केली जाणार आहे.
तसेच सामाजिक अर्थसहाय्य प्रकरणे, विविध शासकीय योजनांची मंजुरी, घरांसाठी पट्टे वाटप, ई-पीक नोंदणी आणि पी.एम. किसान नोंदणी आदी सेवा देखील उपलब्ध राहणार आहेत. नगर परिषद, पंचायत समिती, आरोग्य व इतर विभागांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याने नागरिकांची प्रशासकीय कामांसाठी होणारी धावपळ कमी होणार आहे.
महागाव तालुक्यातील शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे : ७ मार्च २०२६ – हिवरा, १४ मार्च २०२६ – काठी (दो.), १ एप्रिल २०२६ – कासोळा, १० एप्रिल २०२६ – गुंज, १७ एप्रिल २०२६ – मोरथ, ८ मे २०२६ – फुलसावंगी आणि १५ मे २०२६ – महागाव.
उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांनी नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून प्रलंबित कामांचा तातडीने निपटारा करून घ्यावा, असे आवाहन केले आहे. तर तहसीलदार अभय मस्के यांनी ही योजना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यावर प्रशासनाचा भर असल्याची माहिती दिली असून या उपक्रमामुळे महसूल सेवा अधिक पारदर्शक, गतिमान व नागरिकाभिमुख होणार असल्याचा म्हस्के यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
