दहा दिवस जिओ ठप्प; रिचार्जचे पैसे वाया, ग्राहक संतप्त – टेक्निशियन आंदोलनामुळे सेवा कोलमडली

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / १७ फेब्रुवारी
महागाव :
महागाव तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून रिलायन्स जिओ चे नेटवर्क पूर्णपणे बंद पडल्याने हजारो ग्राहक अक्षरशः हैराण झाले आहेत. कॉल लागत नाहीत, इंटरनेट सेवा ठप्प असून ऑनलाइन व्यवहार अडकले आहेत. रिचार्ज संपायला दोन दिवस बाकी असतानाच कंपनीकडून मेसेज येतात; मात्र सेवा शून्य असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क हे चैनीचे साधन नसून शेती, शिक्षण आणि व्यवसायासाठी अत्यावश्यक असल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. शेतकऱ्यांना पीकनोंदी व बाजारभाव पाहता येत नाहीत, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग बंद पडले आहेत, तर व्यापाऱ्यांचे UPI व्यवहार ठप्प झाल्याने थेट आर्थिक नुकसान होत आहे. सलग दहा दिवस सेवा न मिळणे म्हणजे ग्राहकांची सरळ फसवणूक असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
खंडित झाल्यामुळे अनेकांनी पर्याय म्हणून बीएसएनएल, वोडाफोन आयडिया आणि एअरटेल कडे वळण्यास सुरुवात केली असून नवीन सिमकार्ड घेण्यासाठी मोबाईल दुकाने गजबजली आहेत. “सेवा नाही तर ग्राहक नाही” असा इशारा नागरिकांनी दिला आहे.ग्राहकांचा आणखी एक गंभीर प्रश्न पुढे आला आहे. सेवा बंद असताना गेलेल्या दहा दिवसांच्या रिचार्जची भरपाई कोण देणार ? नेटवर्क एररमुळे झालेला मानसिक त्रास व आर्थिक नुकसान भरून काढावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
टेक्निशियनांचे ठिय्या आंदोलन; दुरुस्तीचे काम ठप्प
नेटवर्क दुरुस्तीचे काम करणाऱ्या प्रताप टेलिकास्ट प्रा. लि. अंतर्गत कार्यरत टेक्निशियन मागील सात दिवसांपासून सवना येथील आई नौचंडिका देवी संस्थान परिसरात ठिय्या आंदोलन करत आहेत. पगारवाढ, विमा संरक्षण आणि सुरक्षा साधनांची मागणी त्यांनी केली असून मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. यापूर्वी त्यांनी पुसदमध्येही आंदोलन केले होते.टेक्निशियनांच्या म्हणण्यानुसार, एमएच–१ व एमएच–२ कॅटिगरी अंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील सुमारे १८ जिल्ह्यांत अशाच समस्या आहेत. वरिष्ठ अधिकारी केवळ आश्वासने देतात; मात्र प्रत्यक्ष निर्णय होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
एकीकडे ग्राहकांचे नेटवर्क बंद, तर दुसरीकडे दुरुस्ती करणारेच आंदोलनावर असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. व्यापारी, शेतकरी व विद्यार्थी सर्वच अडचणीत आले आहेत. स्थानिक प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सेवा सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
⬛दरम्यान, आंदोलकांचे निवेदन आमदार किसनराव वानखेडे यांच्या उपस्थितीत स्वीकारण्यात आल्याची माहिती भाजप समन्वयक नितीन भुतडा यांनी लोकवेध न्यूजशी बोलताना दिली. तसेच याबाबत भाजपचे नेते,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगत लवकरच तोडगा निघेल, असा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान,सेवा सुरू करा, रिचार्जची भरपाई द्या” या मागणीसाठी ग्राहकांकडून लवकरच आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
