घरकुल लाभार्थ्यांना दिलासा : उमरखेडमध्ये मोफत रेती वाटपाचा शुभारंभ

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / १४ फेब्रुवारी 

 

उमरखेड :- 

 

 घरकुल बांधकामाचा खर्च कमी करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदत करण्याच्या उद्देशाने उमरखेड विधानसभा मतदारसंघात मोफत रेती वाटप उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. बिटरगाव घाटावर आमदार किसन वानखेडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ झाला.

केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळावे, या हेतूने राज्य शासनाने घरकुल बांधकामासाठी लागणारी रेती मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘प्रत्येकाला हक्काचा निवारा’ या संकल्पनेला बळ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

उमरखेड तालुक्यातील बिटरगाव घाटावरून लाभार्थ्यांना प्रत्यक्ष रेती उपलब्ध करून दिली जाणार असून त्यामुळे घरकुल बांधकामाचा खर्च कमी होऊन कामाला गती मिळणार आहे. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास आमदार वानखेडे यांनी व्यक्त केला.

यावेळी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, तहसीलदार राजू सुरडकर, बिटरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार पांडुरंग शिंदे, मंडळ अधिकारी गजानन सुरोशे, सरपंच लता घोडगे, डॉ. तिवारी, विनोद मामीडवार, पोलीस पाटील नामदेव देवकते, भास्कर देवकते, अनिल नरवाडे (ग्राम महसूल अधिकारी), ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे घरकुल लाभार्थ्यांच्या घरबांधणी प्रक्रियेला वेग मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या