महागाव तालुक्यात घरकुलांची ‘ग्राउंड चाचणी’ ; सीईओ मंदार पत्कींचा थेट दौरा, प्रशासन अलर्ट

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क /११ फेब्रुवारी 

 महागाव :- 

 

महागाव : यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की हे उद्या दिनांक १२ फेब्रुवारी रोजी गुरुवारी महागाव तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून घरकुल बांधकामाच्या प्रगतीचा प्रत्यक्ष आढावा घेणार आहेत. मार्च २०२६ पर्यंत जिल्ह्यासाठी तब्बल एक लाख चाळीस हजार घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्यापैकी एकट्या महागाव तालुक्याला अकरा हजार घरकुलांचे लक्ष्य देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

मंदार पत्की हे घोंसारा, काळी दौलत खान, कासोळ, गुंज आणि सवना या गावांना भेट देऊन घरकुल बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हिवरा, करंजखेड, भांब, चील्ली येथे भेट देणार असून डेप्युटी सीईओ कोठारी वडद, मुडाना, उटी आणि पोखरी या गावांमध्ये जाऊन स्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे. एकूण पंधरा गावांमध्ये घरकुल योजनेची अंमलबजावणी तपासली जाणार आहे.

२६ जानेवारी २०२६ पासून शासनस्तरावरून घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. हा निधी प्रत्यक्ष बांधकामासाठी वापरण्यात आला आहे की नाही, कामाची सद्यस्थिती काय आहे, प्रगती अहवाल व प्रत्यक्ष वास्तव यात किती तफावत आहे, याची सखोल छाननी होणार आहे.या दौऱ्याची खात्रीलायक माहिती समोर येताच महागाव पंचायत समिती प्रशासन सतर्क झाले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, सरपंच तसेच घरकुल लाभार्थी यांच्यात हालचालींना वेग आला असून कागदपत्रे, नोंदी आणि प्रत्यक्ष कामे पूर्ण करण्यासाठी धांदल उडाल्याचे चित्र आहे.जिल्हा पातळीवर दिलेले मोठे उद्दिष्ट आणि त्यात महागाव तालुक्याचा लक्षणीय वाटा लक्षात घेता हा दौरा केवळ औपचारिक न राहता कामगिरीची खरी परीक्षा ठरणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या