कृषी गौरवातून ज्ञान,अनुभव–तंत्रज्ञानाची व्यापक देवाणघेवाण डॉ. विजयराव माने यांचे प्रतिपादन; २६ कर्तृत्ववानांचा राज्यस्तरीय गौरव

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क

उमरखेड :

शेतकरी हा केवळ उत्पादक नसून तो सतत नवे प्रयोग करणारा संशोधक आहे. स्वतःच्या अनुभवातून आत्मसात केलेल्या तंत्रज्ञानावर त्याचा ठाम विश्वास असतो. शेतकरी व शेती समृद्ध व्हावी,या उद्देशाने प्रगतशील शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ,कृषी उद्योजक, कृषी विस्तारक तसेच कृषीविषयक लेखन करणारे माध्यम प्रतिनिधी एकत्र येऊन यशस्वी प्रयोग, अनुभव व आधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करतात. ही कार्यशाळा सर्व शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणारी असल्याचे प्रतिपादन कृषी महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. विजयराव माने यांनी केले.

एकात्मिक शेती पद्धतीमुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाचा भाव स्वतः ठरवण्याची संधी मिळते. शेतीमालावर प्रक्रिया करून स्वतंत्र बाजारपेठ निर्माण केल्यास शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधता येते. राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने कृषी क्षेत्रात अवगत झालेले ज्ञान, अनुभव व तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.लोकनेते, सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब माने यांच्या स्मृतिदिनानिमित्त गेल्या २४ वर्षांपासून दरवर्षी जानेवारी महिन्यात कृषी कार्यशाळा व कृषी गौरव पुरस्कार सोहळा सातत्याने आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमातून शेतीतील नवे तंत्रज्ञान,संशोधन, प्रक्रिया उद्योग,शेतीपूरक व्यवसाय व यशस्वी प्रयोगांची माहिती ‘ट्रान्स्फर ऑफ टेक्नॉलॉजी’च्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जात आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या हस्ते झाले. यावेळी २६ कर्तृत्ववान शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, कृषी उद्योजक, कृषी प्रसारक व माध्यम प्रतिनिधींना ‘भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.सत्कारमूर्तींनी आपल्या यशामागील संघर्ष, प्रयोग, अनुभव आणि तंत्रज्ञानाचे सादरीकरण करून स्थानिक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. पारंपरिक ज्ञान, आधुनिक कृषी विद्यापीठीय तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष शेतातील अनुभव यांचा संगम साधत ज्ञानाची प्रभावी देवाणघेवाण घडून आली.

कार्यक्रमास खासदार नागेश आष्टीकर, आमदार किसनराव वानखेडे, माजी आमदार नामदेव ससाणे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक वानखेडे यांच्यासह कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वानखेडे यांनी केले, तर उद्धव गायकवाड यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या