शोकातही एकतेचे दर्शन; महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीत अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क 

महागाव:- 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे काल दिनांक २८ जानेवारी रोजी सकाळी विमान अपघातात दुःखद निधन झाले.ही दुःखद बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शोककळा पसरली.दरम्यान आज दिनांक २९ जानेवारी रोजी त्यांच्या पार्थिदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी महागाव तालुक्यासह संपूर्ण परिसरातील सर्वपक्षीय नेते एकत्र येत दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर महागाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन करण्यात आले.यावेळी दिवंगत नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

शोक सभेस माजी आमदार राजेंद्र नजरधने,ज्येष्ठ नेते संभाजीराव नरवाडे, सुभाषराव देशमुख (सवना), सितारामजी ठाकरे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख सवनेकर, साहेबराव पाटील हिवरेकर,विजय महाजन, महेंद्र कावळे, डॉ. बी. एन. चव्हाण, राजू राठोड, योगेश वाजपेयी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रवीण ठाकरे, शैलेश कोपरकर, सुरेश नरवाडे, जयंत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्र पवार व संचालक मंडळ,विशाल पवार (खरेदी-विक्री संघ अध्यक्ष) व संचालक मंडळासह तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने शोक सभेला उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजितदादा पवार यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. दोन मिनिटांचे मौन पाळून दिवंगत नेत्यास श्रद्धांजली वाहण्यात आली. या शोक सभेत राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय ऐक्याचे व एकजुटीचे प्रभावी दर्शन घडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या