दुसऱ्यांचे बॅनर पाहण्यात आयुष्य घालवू नका; असे कर्तृत्व घडवा की गावकरी तुमचे बॅनर लावतील 

लोकवेध न्यूज नेटवर्क

महागाव :—

मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे दिशाहीन होत चाललेल्या तरुणाईला आत्मभानाची साद घालत,स्क्रीनवर दिसणाऱ्या रील्समध्ये आयुष्य हरवण्यापेक्षा असे उत्तुंग काम करा की तुमचे कर्तृत्वच तुमची ओळख बनेल, असे ओजस्वी प्रतिपादन सुप्रसिद्ध प्रबोधनकार व व्याख्याते गोविंद पोलाड यांनी केले.

फुलसावंगी पत्रकार संघाच्या वतीने शनिवार, दि. १७ जानेवारी रोजी फुलसावंगी येथील स्व. सुधाकर नाईक महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अभय मस्के होते. पोलाड यांच्या विचारप्रवण शैलीने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले.स्त्री–पुरुष समानतेपासून वैज्ञानिक दृष्टिकोनापर्यंत विविध विषयांवर परखड मांडणी करताना पोलाड म्हणाले की, पाहुणचाराची तथाकथित ‘नियमावली’ कुठल्या पुस्तकात नाही; ती पुरुषसत्ताक मानसिकतेची निर्मिती आहे. फुले दाम्पत्याने स्त्रियांना चौकटीबाहेरचे आकाश खुले करून दिले.हा,वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आजच्या पिढीची आहे.

अंधश्रद्धेवर प्रहार करत त्यांनी सांगितले की, खोट्या चमत्कारांपेक्षा विचारांची ताकद मोठी असते.संविधान घडविणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच खरे आदर्श आहेत. त्यांचे विचार विद्यार्थ्यांच्या अंगात यायला हवेत.छत्रपती शिवाजी महाराज,शाहू–फुले–आंबेडकरांच्या विचारांची परंपरा जपणारी पिढी घडली पाहिजे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.सोशल मीडियाच्या भुलभुलैय्यावर भाष्य करताना पोलाड म्हणाले,विराट कोहली किंवा लिओनेल मेस्सी यांचा एक फोटो कोट्यवधींचा असतो.मात्र आपली तरुणाई स्वतःचे फोटो सजवण्यासाठी खर्च करते आणि तरीही समाधान मिळत नाही.हे खूळ डोक्यातून काढा,अभ्यास करा,कौशल्य वाढवा आणि मायबापांची स्वप्ने पूर्ण करा,असा थेट संदेश त्यांनी दिला.

रंग, रूप आणि दिखावा तीसपर्यंतच,पुढे श्रीमंती–गरिबीची वास्तवाची रेषा उभी राहते. नोकरी आणि कौशल्य असलेल्यांचे आयुष्य सावरते,असे सांगत त्यांनी विद्यार्थीदशेत वेळ वाया न घालवता ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.यावेळी व्याख्याते प्रा. निरंजन राठोड, ठाणेदार धनराज निळे, उपसरपंच कुणाल नाईक, प्रा.विनोद राठोड, प्रा. संदीप चंद्रवंशी, प्रा. सुधीर भाटे, गझलकार शेख आबिद आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार शैलेश वानखेडे यांनी केले, सूत्रसंचालन शेख तसलीम यांनी तर आभार गजानन वाघमारे यांनी मानले.फुलसावंगी पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांच्या परिश्रमामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या