आई जिजाऊंच्या चरणी बहुजनांची वारी ! १२ जानेवारीला सिंदखेड राजा गजबजणार; यवतमाळसह राज्य-देशातून लाखो जिजाऊ भक्तांचा महासागर

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क

यवतमाळ :

बहुजन समाजाला घडविणाऱ्या, शिवरायांच्या संस्कारांची जननी असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाचा भव्य सोहळा येत्या १२ जानेवारी रोजी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहात साजरा होणार आहे. मराठा सेवा संघ यांच्या वतीने आयोजित या ४२८ व्या आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सवाला यवतमाळ जिल्ह्यासह महाराष्ट्र, देश व विदेशातून लाखो जिजाऊ भक्तांची उपस्थिती अपेक्षित आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असून, या पवित्र भूमीवर जन्मोत्सवानिमित्त सर्वत्र उत्सवाचे वातावरण आहे. सुमारे २०० एकर परिसरात आकार घेत असलेल्या जिजाऊ सृष्टी प्रकल्पामुळे या वर्षीचा जन्मोत्सव अधिक भव्य, दिव्य आणि ऐतिहासिक ठरणार आहे. दरवर्षी १२ जानेवारी रोजी २० ते २५ लाखांहून अधिक भक्त येथे येऊन आई जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होतात.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६ वाजता जिजाऊ वाड्यावर दहा प्रमुख जोडप्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊंच्या पूजनाने होणार आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता जिजाऊ सृष्टी परिसरात ध्वजारोहण, शाहिरी कार्यक्रम, पुस्तक प्रकाशन, शिवविवाह सोहळा तसेच विविध पुरस्कारांचे वितरण पार पडणार आहे.

दुपारी १.३० ते ४ वाजेदरम्यान शिवधर्मपीठ येथे मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, हा कार्यक्रम मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यात मराठा सेवा संघाचे सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून,

मराठा तंत्रभूषण पुरस्कार शिवश्री कैलास नर्मदाताई साहेबराव काटकर,मराठा शिक्षणभूषण पुरस्कार शिवश्री रामदास छबुबाई मधुकर झोळ,मराठा कृषीभूषण पुरस्कार शिवश्री अमृतराव दादाराव देशमुख,

मराठा क्रीडाभूषण पुरस्कार शिवश्री रितेश राजेंद्र केरे,तर जिजाऊ पुरस्कार शिवमती गंगा गीता संभाजीराव कदम यांना प्रदान करण्यात येणार आहे.अध्यक्षीय समारोपात शिवधर्मपीठावरून पुरुषोत्तम खेडेकर यांचे सामाजिक परिवर्तनाला दिशा देणारे, बहुजन समाजात नवचैतन्य निर्माण करणारे प्रेरणादायी भाषण होणार आहे.

या ऐतिहासिक आणि वैचारिक जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यास जिल्ह्यातील व राज्यातील जिजाऊ भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राज्य उपाध्यक्ष दिगंबर जगताप, विभागीय अध्यक्ष सुरेश कदम,राज्य कार्यकारिणी सदस्य वसंतराव देशमुख व जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या