पदवी नाही,थेट नोकरी ! ६५० विद्यार्थ्यांचा सहभाग, २०८ जणांना नियुक्ती ,गावंडे महाविद्यालयाचा रोजगार मेळावा ठरला मैलाचा दगड

 

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क

 

उमरखेड :

 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर शिकून पुढे काय, हा कायमचा प्रश्न असतो. मात्र उमरखेड येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय यांनी हा प्रश्न थेट नोकरी देत सोडवून दाखवला आहे. दिनांक २ जानेवारी रोजी महाविद्यालयातील ‘रोजगार कक्षा’च्या पुढाकाराने आयोजित भव्य रोजगार मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर रोजगाराची स्पष्ट दिशा मिळाली.

या,रोजगार मेळाव्यासाठी तब्बल ६५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. हा कार्यक्रम केवळ औपचारिक न राहता प्रत्यक्ष उपयोगाचा ठरला. देशातील १५ नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी स्वतः उमरखेडमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या थेट मुलाखती घेतल्या. गुणवत्ता,कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या आधारे निवड प्रक्रिया पार पडली.या मुलाखतीनंतर २०८ विद्यार्थ्यांची थेट निवड झाली. यामध्ये गावंडे महाविद्यालयातील १२८ विद्यार्थ्यांचा समावेश असून उर्वरित विद्यार्थी परिसरातील इतर महाविद्यालयांमधील आहेत.निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली असून त्यांना तत्काळ नोकरीची संधी मिळाली आहे.

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोठ्या कंपन्यांपर्यंत पोहोचणे आजही कठीण असते. शहरात जाण्याचा खर्च,राहण्याची अडचण आणि अनिश्चितता यामुळे अनेक संधी हातातून निसटतात.हीच बाब लक्षात घेऊन महाविद्यालयाने कंपन्यांनाच थेट विद्यार्थ्यांपर्यंत आणले.एकाच ठिकाणी मुलाखत, निवड आणि नियुक्तीपत्र मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला.

या रोजगार मेळाव्यात ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, बायोटेक्नॉलॉजी,उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. विद्यमान तसेच माजी विद्यार्थ्यांना या कंपन्यांमधून नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली.

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थाचे अध्यक्ष राम देवसरकर व सचिव डॉ.यादवराव राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांच्या नेतृत्वाखाली रोजगार कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. पी. डी. शिरभाते व प्रा. आय. वाय. खान यांनी नियोजनबद्ध मेहनत घेतली. तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी एकत्रित प्रयत्न करून हा मेळावा यशस्वी केला.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच आमचा मुख्य उद्देश असल्याचे अध्यक्ष राम देवसरकर यांनी सांगितले.शिक्षणासोबतच क्रीडा,कौशल्य विकास आणि रोजगार या सर्व बाबींवर भर दिला जात असून बालवाडी ते नोकरी असा स्पष्ट दृष्टिकोन ठेवून संस्था काम करत आहे.नर्सरीपासून शिक्षण घेणारा विद्यार्थी नोकरीपर्यंत पोहोचावा,हा आमचा ठाम मानस असल्याचे त्यांनी बोलतांना स्पष्ट केले.एकूणच, गावंडे महाविद्यालयाचा हा रोजगार मेळावा म्हणजे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिलेली ठोस हमी असून, शिक्षणातून थेट रोजगाराकडे नेणारा हा उपक्रम इतर महाविद्यालयांसाठीही प्रेरणादायी ठरणारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या