स्वाभिमानीच्या लढ्याला यश; वर्षभरानंतर यवतमाळला जिल्हा कृषी अधीक्षक, शेतकऱ्यांत जगण्याची नवी उमेद

लोकवेध न्यूज नेटवर्क 

यवतमाळ :- 

 

शेतकरी आत्महत्यांनी हादरलेल्या यवतमाळ जिल्हा मध्ये तब्बल एक वर्षानंतर जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी पद भरले गेले आहे. मनोज ढगे यांच्या नियुक्तीमुळे शेतकऱ्यांत दिलासा व आशा निर्माण झाली असून, या यशाचे श्रेय स्वाभिमानी शेतकरी संघटना च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला जाते,अशी माहिती शेतकरी नेते मनीष जाधव यांनी लोकप्रिय मराठी न्यूज पोर्टल, लोकवेधशी बोलतांना दिली.

मागील एक वर्षापासून जिल्हा कृषी अधीक्षक पद रिक्त असल्याने कृषी विभागाचा कारभार अतिरिक्त प्रभारावर सुरू होता.संपूर्ण खरीप हंगामात विभाग प्रभावीपणे कार्य करू शकला नाही.या काळात सततची नापिकी, कर्जबाजारीपणा,शेतमालाला भाव न मिळणे, वाढता उत्पादन खर्च,बदलते हवामान आणि कालबाह्य पीक पद्धती यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला. ३३४ दिवसांत ३४२ शेतकरी आत्महत्यांचे दाहक वास्तव जिल्ह्याने पाहिले, असा गंभीर आरोप मनीष जाधव यांनी केला.

जिल्ह्याला तातडीने जिल्हा कृषी अधीक्षक मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना भेट देत कार्यालयाचा ‘ताबा’ आंदोलनाचा इशारा दिला होता.दरम्यान त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले.राज्य शासनाकडे विषयाची गांभीर्याने दखल घेण्यात आली. यासाठी तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, विद्यमान कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, तसेच विरोधी पक्षनेते विजय वेडेंटीवार यांचे सहकार्य लाभल्याबद्दल जाधव यांनी आभार मानले. या विषयावर प्रसार माध्यमांनी बातम्या प्रकाशित केल्याने दबाव वाढला.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शासनाने यवतमाळला जिल्हा कृषी अधीक्षक दिला.याबद्दल शासनाचे तसेच या मागणीसाठी झटलेल्या स्वाभिमानीचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांचे जाहीर आभार व्यक्त करण्यात आले.नव नियुक्त अधिकारी मनोज ढगे यांनी शेतकऱ्यांत आत्मविश्वास निर्माण करावा, पीक पद्धतीत आवश्यक बदल घडवून उत्पादन खर्च कमी करण्यावर भर द्यावा,आधुनिक तंत्रज्ञान थेट बांधावर पोहोचवावे,नानाजी देशमुख संजीवनीसारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, शेतकरी–कृषी विभाग संवाद वाढवावा, तसेच बोगस खते व कीटकनाशकांच्या विक्रीवर कडक निर्बंध घालावेत,अशी अपेक्षा मनीष जाधव यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या