व्हीपचे पालन करत निष्ठा जपली; गद्दारी माझ्या रक्तात नाही – नगरसेवक महेश पाटील

लोकवेध न्यूज नेटवर्क / २७ फेब्रुवारी 

महागाव:- 

महागाव : नगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर महागाव नगरपंचायतीत राजकीय घडामोडींना वेग आला असताना नगरसेवक महेश गजानन पाटील यांनी पक्षनिष्ठा आणि प्रामाणिकपणाचा पुनरुच्चार केला आहे. पक्षाने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन केल्याचे त्यांनी स्पष्ट करत, सत्तेसाठी तत्त्वांशी तडजोड करणार नसल्याची ठाम भूमिका मांडली.

महेश पाटील म्हणाले की, त्यांच्या वडिलांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्यातून त्यांना सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली. निवडून आल्यापासून आजपर्यंत त्यांनी पक्षाशी व मतदारांशी कधीही प्रतारणा केली नसून गद्दारी करणे त्यांच्या स्वभावात नाही, असे त्यांनी नमूद केले.

नगराध्यक्ष निवडीवेळी पक्षाचा व्हीप पाळल्याचे सांगताना त्यांनी राजकारणात जय-पराजय होतच असतो, मात्र तत्त्वे विकून सत्ता मिळवणे स्वीकारार्ह नसल्याचे स्पष्ट केले. संख्याबळ कमी पडले असले तरी जनतेसमोर आपली प्रामाणिकता सिद्ध झाल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच कोणत्याही पक्षाविषयी वैयक्तिक आकस नसून लोकशाही प्रक्रियेला खिलाडूवृत्तीने स्वीकारत असल्याचे त्यांनी सांगितले. पद असो वा नसो, महागाव शहर व आपल्या प्रभागाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या