महागाव नगरपंचायतीत राजकीय ‘मास्टरस्ट्रोक’ : अल्पमतातील भाजप थेट सत्तेवर; रंजना आडे नगराध्यक्ष १२-५ ने विजयी

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / २७ फेब्रुवारी
महागाव :-
महागाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत आज भाजपने प्रभावी रणनीती राबवत सत्तेवर झेंडा रोवला. सभागृहात केवळ चार नगरसेवक असतानाही समविचारी गटांचे समर्थन मिळवत भाजपच्या सौ. रंजना दीपक आडे यांनी १२ विरुद्ध ५ मतांनी दणदणीत विजय मिळवला. अधिकृत निकाल जाहीर होताच शहरात ढोल-ताशांच्या गजरात विजयी मिरवणूक काढण्यात आली.
नगराध्यक्षपदासाठी सुरुवातीला काँग्रेसच्या सौ. जयश्री संजय नरवाडे यांचे नाव आघाडीवर होते; मात्र ऐनवेळी भाजपकडून रंजना आडे यांचे नामांकन दाखल झाल्याने राजकीय समीकरणांना कलाटणी मिळाली. काँग्रेसकडून सौ. रुपाली संतोष कोल्हेकर यांनी उमेदवारी दिली होती. प्रत्यक्ष मतदानात आडे यांना १२ मते मिळाली, तर कोल्हेकर यांना ५ मतांवर समाधान मानावे लागले.
सभागृहातील संख्याबळ विरोधकांकडे असतानाही काँग्रेस, उबाठा गट व शिवसेनेने अंतर्गत समन्वय साधून घेत भाजप सोबत विकासाच्या मुद्द्यावर गटबंधन उभे केले. या मुत्सद्दी राजकीय खेळी मुळे भाजपला बहुमत आपल्या बाजूला वळवण्यात यश आले आणि महागावच्या राजकारणात मोठे सत्तांतर घडले.
निवड प्रक्रियेत पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी सखाराम मुळे यांनी काम पाहिले, तर मुख्याधिकारी कुरवाडे यांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रक्रिया पार पडली.
दरम्यान, या सत्तांतरामागे ‘किंगमेकर’ म्हणून नितीन भुतडा यांच्या रणनीतीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. विरोधकांकडे संख्याबळ अधिक असतानाही भाजपने आखलेल्या राजकीय डावपेचांमुळे नगराध्यक्षपद आपल्या ताब्यात घेतल्याने महागाव नगरपंचायतीतील सत्ता समीकरण पूर्णतः बदलले आहे.
महागाव नगरपंचायतीवर आता अधिकृतपणे भाजपची सत्ता स्थापन झाली असून विकासकामांच्या अंमलबजावणीवर नव्या सत्ताधाऱ्यांची खरी कसोटी लागणार आहे.
