“बोले तैसा चाले” विसरलेले नेते; काल विरोध,आज व्हीप , सत्ता परत मिळवण्यासाठी काँग्रेसची धडपड

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / २६ फेब्रुवारी

महागाव : 

महागाव नगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये भूमिका बदलण्याचा सिलसिला सुरू असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. कालपर्यंत सभेला जाणार नाही आणि विरोधी बाकावर बसणार अशी भूमिका घेणारे गटनेते आता अचानक व्हीप काढून सर्व नगरसेवकांनी सभेला हजर राहावे,असे आदेश देत आहेत.त्यामुळे पक्षातील विसंवाद उघड झाला आहे.

२७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेत काँग्रेसच्या उमेदवार सौ. रुपाली संतोष कोल्हेकर यांच्या बाजूने हात वर करून मतदान करावे, असे गटनेते शैलेश दिलीपराव सुरोशे यांनी स्पष्ट केले आहे. कोणी गैरहजर राहिल्यास महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अपात्रता अधिनियम १९८६ अंतर्गत कारवाई होऊ शकते,असा इशाराही देण्यात आला आहे.

मात्र यापूर्वी अविश्वास ठरावाच्या दिवशी गटनेते स्वतःच सभेला अनुपस्थित राहिले होते. त्यानंतर “आम्ही या प्रक्रियेत सहभागी होणार नाही”असे त्यांनी सांगितले होते. आता अचानक भूमिका बदलल्याने “नेमकी काँग्रेसची भूमिका काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान,काँग्रेसचे तीन नगरसेवक विकासाच्या मुद्द्यावर भाजपच्या बाजूने गेले आहेत.आता उरले केवळ पाच त्यातही एकच मतदान होते की नाही याची शशांकता आहे.उरलेल्या नगरसेवकांची उपस्थिती पक्षासाठी निर्णायक ठरणार वाटत असेल तरी ही निवडणूक केवळ औपचारिक राहिली आहे. व्हीप अधिकृत वृत्तपत्रात प्रकाशित झाला असला तरी आता मात्र सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होतांना दिसून येत आहे.या सर्व बदलत्या भूमिकेमुळे पक्षातील समन्वयाचा अभाव स्पष्ट झाला आहे.

भाजपने आपले संख्याबळ मजबूत केल्याचे चित्र असून काँग्रेसकडून सत्ता परत मिळवण्यासाठी शेवटच्या क्षणी प्रयत्न सुरू आहेत. संतवचनातील “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” हा संदेश अंगीकारण्याची वेळ असताना भूमिका बदलत सत्ता मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.त्यामुळे उद्याची निवडणूक काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई ठरणार असून निकालाकडे महागावकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या