दादागिरी की विकास ? काळी (दौ.)तील व्हायरल घटनेचे राजकीय पडसाद; मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने ?
⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / २५ फेब्रुवारी
महागाव:-
महागाव तालुक्यातील काळी (दौ.) येथे ग्रामपंचायतीच्या कामांवरून झालेल्या वादात सरपंच पतीकडून कथितरित्या लाकूड घेऊन धाव घेत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ मागील पंधरवड्यात व्हायरल झाल्यानंतर गावातील राजकारण ढवळून निघाले आहे. या घटनेमुळे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नच नव्हे तर आगामी ग्रामपंचायत व जिल्हा परिषद निवडणुकांतील राजकीय समीकरणांवरही परिणाम होणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
ग्रामपंचायतीतील विकासकामांच्या गुणवत्तेवरून उफाळलेल्या या वादात एका बाजूला निकृष्ट कामे व भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, तर दुसऱ्या बाजूला राजकीय सूडातून खोट्या तक्रारी केल्याचा पलटवार आहे. मात्र या सर्वांपेक्षा व्हायरल झालेल्या कथित धमकीच्या व्हिडिओ प्रकाराने गावातील सामान्य मतदारांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींच्या कुटुंबियांकडूनच आक्रमक वर्तन होत असल्याची चर्चा गावपातळीवर रंगली असून “विकास विरुद्ध दबावशाही” असा मुद्दा पुढे येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना प्रतिमा हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. अशा पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटाशी संबंधित पदाधिकाऱ्यावर दादागिरीचे आरोप होत असल्याने विरोधकांना आयतेच राजकीय भांडवल मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामपंचायतीत त्यांच्या पतींचा हस्तक्षेप हा मुद्दा बनू शकतो, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
गावातील तरुण मतदार व महिला मतदार वर्ग या प्रकरणाकडे बारकाईने पाहत असून “कामाचा दर्जा आणि वर्तनशैली” या दोन निकषांवर मत ठरणार असल्याचे स्थानिक स्तरावर बोलले जात आहे.जर विकासकामांची गुणवत्ता समाधानकारक नसल्याची भावना अधिक बळावली आणि त्यात आक्रमक वर्तनाची प्रतिमा जोडली गेली, तर सत्ताधारी गटाला निवडणुकीत फटका बसू शकतो.उलटपक्षी,आरोप राजकीय प्रेरित असल्याचे सिद्ध करण्यात यश आले तर सहानुभूतीची लाटही निर्माण होऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे.
या घटनेनंतर ग्रामपंचायतीतील कामांची तांत्रिक चौकशी,पारदर्शकता आणि लोकप्रतिनिधींच्या वर्तनाचा मुद्दा निवडणूक प्रचारात केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे आहेत.व्हायरल व्हिडिओ, दादागिरीचे आरोप आणि भ्रष्टाचाराच्या चर्चेमुळे काळी (दौ.) गावातील निवडणूक यंदा केवळ विकासाच्या मुद्द्यावर नव्हे तर “विश्वास विरुद्ध भीती” या भावनिक पातळीवर लढली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आता खरा प्रश्न असा आहे की, मतदार विकासाच्या दाव्यांवर विश्वास ठेवतील की आक्रमक प्रतिमेला नाकारतील हे ,आगामी निवडणुकीत काळी दौलत ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतपेटीतून या सत्तासंघर्षाचा निकाल लागणार असून अशा दंडेलशाही व आक्रमक्र वृत्तीच्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा सभागृहात जाण्याची संधी लाभेल का ? ही येणारी वेळच सांगणार असून संपूर्ण महागाव तालुक्याचे लक्ष या राजकीय लढतीकडे लागणार आहे.
