महागाव नगरपंचायतीत समित्यांची नवी ‘टीम’; बांधकाम, आरोग्य, नियोजन व पाणीपुरवठा समितीचे सभापती ठरले

लोकवेध न्यूज नेटवर्क / ०६ मार्च २०२६
महागाव : –
नगरपंचायतीच्या कामकाजाला अधिक गती देण्यासाठी महागाव नगरपंचायतीत विविध विषय समित्यांची स्थापना करण्यात आली असून संबंधित समित्यांच्या सभापतींचीही निवड जाहीर करण्यात आली आहे. बुधवार, दि. ५ मार्च २०२६ रोजी आयोजित विशेष सभेत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
नगरपंचायत सभागृहात सकाळी ११ वाजता विशेष सभेला सुरुवात झाली. उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी राम मुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. सभेचे पहिले सत्र सकाळी पार पडले,तर दुपारी ३ वाजेपर्यंत पुढील सत्रात विविध विषय समित्यांच्या स्थापनेची व निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
या विशेष सभेत नगरपंचायतीच्या स्थायी समितीसह विविध विषय समित्यांची स्थापना,समित्यांची सदस्यसंख्या निश्चिती, सदस्यांची निवड तसेच सभापती व उपसभापती निवडीची प्रक्रिया पार पडली.दुपारच्या सत्रात विषय समित्यांच्या सभापती निवडीवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. ज्या समित्यांमध्ये नगरपंचायत उपाध्यक्ष पदसिद्ध सभापती असतात त्या समित्या वगळता इतर समित्यांच्या सभापतींची निवड संबंधित सदस्यांकडून करण्यात आली. सभापती व उपसभापती पदांसाठी नामनिर्देशन पत्रे दुपारी २ ते ३ या वेळेत स्वीकारण्यात आली.
निवड प्रक्रियेनंतर बांधकाम समितीच्या सभापतीपदी विशाल पांडे,आरोग्य समितीच्या सभापतीपदी सुनीता डाखोरे, नियोजन समितीच्या सभापतीपदी प्रमोद उर्फ शाखा भरवाडे तर पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी सुरेश नरवाडे यांची निवड जाहीर करण्यात आली.
या प्रसंगी भाजपचे समन्वयक नितीन भुतडा, डॉ. इरफान कुंदन, नगरसेवक सुजित ठाकूर,गजानन साबळे, रामराव पाटील नरवाडे, फुलसावंगी मंडलअध्यक्ष योगेश वाजपेयी, नगरसेवक परवेज सुरैया,भाजपचे माजी तालुका अध्यक्ष दीपक आडे, भाजप शहराध्यक्ष निलेश नरवाडे, नगरसेविका जयश्री नरवाडे, आशा शंकर बावणे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी डाखोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांच्या उपस्थितीत सदर निवड प्रक्रिया पार पडली. विषय समित्यांची स्थापना झाल्यामुळे नगरपंचायतीच्या विविध विभागांशी संबंधित निर्णय प्रक्रिया अधिक सुसूत्र व गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून शहराच्या विकासकामांना त्यामुळे अधिक वेग मिळणार असल्याचे मानले जात आहे.
