महागाव नगरपंचायतीत सत्तांतरानंतर नवे समीकरण;आज विषय समित्यांची निवड,विकास आराखड्याकडे निर्णायक पाऊल

लोकवेध न्यूज नेटवर्क /०६ फेब्रुवारी
महागाव : –
नगरपंचायतीतील अलीकडील सत्तांतरानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला असून आज, दि.६ फेब्रुवारी रोजी विषय समित्यांच्या निवड प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष लागले आहे. दुपारी होणाऱ्या बैठकीत बांधकाम,महिला व बालकल्याण तसेच आरोग्य व शिक्षण या महत्त्वाच्या विषय समित्यांची निवड करण्यात येणार आहे.
सत्तांतरानंतर प्रशासनिक कामकाजाला स्थैर्य देण्याच्या दृष्टीने ही निवड प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.विषय समित्यांच्या माध्यमातूनच नगरपंचायतीच्या धोरणात्मक निर्णयांना गती मिळत असते. त्यामुळे आजच्या बैठकीत कोणाला कोणती जबाबदारी मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नव्या सत्ताधाऱ्यांकडून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. पायाभूत सुविधा बळकट करणे, महिलां व बालकांसाठी कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवणे,तसेच आरोग्य व शिक्षण क्षेत्रात मूलभूत सुधारणा घडवून आणणे,या प्रमुख बाबींवर भर दिला जाणार असल्याची माहिती नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ.रंजना आडे यांनी दिली आहे.
राजकीय दृष्टीने पाहता, विषय समित्यांची रचना ही केवळ पदवाटपाची प्रक्रिया नसून सत्ताधाऱ्यांच्या प्राधान्यक्रमांची दिशा दर्शवणारी ठरते. त्यामुळे आजची निवड ही आगामी पाच वर्षांच्या विकास धोरणाचा पाया मानली जात आहे.नगरपंचायतीतील नव्या समीकरणांमुळे शहराच्या विकासाला नवी चालना मिळेल,असा विश्वास व्यक्त केला जात असून सत्तांतरानंतर स्थैर्य आणि विकास हा संदेश देण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत असल्याचे चित्र आहे.आता या समित्यांच्या कार्यक्षमतेवरच महागावच्या विकासाची गती अवलंबून राहणार आहे.
