महागाव नगराध्यक्षपदाचा फैसला २७ फेब्रुवारीला;भाजप गटबंधन भक्कम,काँग्रेस ने नमते घेतले

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / २४ फेब्रुवारी
महागाव :-
नगरपंचायत महागाव (जि. यवतमाळ) येथील नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी २७ फेब्रुवारी रोजी होणारी प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून सत्तासमीकरण जवळपास स्पष्ट झाल्याचे चित्र आहे. अविश्वास प्रस्तावानंतर वेग घेतलेल्या राजकीय घडामोडींमध्ये भाजप गटबंधनाने संख्याबळ पक्के केल्याचा दावा केला असून काँग्रेस गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी दर्शविल्याने निवडणूक औपचारिकतेकडे झुकत असल्याची चर्चा रंगली आहे.
निवडणूक प्रक्रियेअंतर्गत सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत नगरपंचायत मुख्याधिकारी कक्षात नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर उमरखेडचे उपविभागीय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. वैध उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर १५ मिनिटांच्या आत उमेदवारी मागे घेण्याची संधी देण्यात येईल.अंतिम यादी निश्चित झाल्यानंतर आवश्यक असल्यास मतदानाची प्रक्रिया राबविण्यात येणार असून दुपारी १ वाजता नगरपंचायत सभागृहात विशेष सभेत निकाल जाहीर केला जाणार आहे.
दरम्यान, भाजपचे समन्वयक नितीन भुतडा यांच्या नेतृत्वाखाली शासकीय विश्रामगृहावर झालेल्या गोपनीय बैठकीत पुढील रणनीती निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सर्वानुमते ठरलेल्या नगरसेवकांनाच नगराध्यक्षपदी बसविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात असून उर्वरित कार्यकाळात शहराच्या विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
दुसरीकडे,अविश्वास ठरावानंतर काँग्रेस गटाने वास्तव स्वीकारत विरोधी बाकावर बसण्याची भूमिका घेतली आहे.लोकहिताच्या प्रश्नांवर रचनात्मक विरोध करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला असून त्यामुळे संभाव्य घोडेबाजाराच्या चर्चांना मोठा विराम मिळाल्याचे चित्र आहे.
सुरुवातीला अपक्ष सदस्यांची भूमिका निर्णायक मानली जात असली तरी सत्तासमीकरण स्पष्ट झाल्याने त्यांचे महत्त्व कमी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी भाजप गटबंधनाने सदस्यांना एकत्र ठेवत रणनीती आखली असून नगरसेवकांना पर्यटन आणि देवदर्शन सहल करून दिली आहे.त्यामुळे ही वज्रमूठ काँग्रेसला सोडवता येणार नसल्याने या संदर्भात मात्र काँग्रेसने एकंदरीत या संदर्भात नमते घेतल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे.
एकूणच,महागाव नगरपंचायतीतील नगराध्यक्षपदाची निवड प्रक्रिया आता केवळ औपचारिकता ठरण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी २७ फेब्रुवारीच्या विशेष सभेकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार या पेक्षा आगामी काळातील राजकीय घडामोडींसाठी जातीय समीकरण आणि प्रभावशाली नेतृत्व कौशल असलेल्या नगरसेविका यांना बहाल केल्या जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
