महागाव नगराध्यक्षपदासाठी एकतर्फी समीकरण; भाजप गटबंधन ठाम, काँग्रेस विरोधी बाकावर

ज्ञानेश्वर ठाकरे :
⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / २२ फेब्रुवारी
महागाव :
नगराध्यक्ष सौ. सुनंदाताई दिलीपराव कोपरकर यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर महागाव नगरपंचायतीतील राजकीय हालचालींना वेग आला असून नव्या नगराध्यक्षपदासाठी पडद्यामागील बैठका आणि अंकगणित जुळवण्याचे प्रयत्न पूर्णत्वाकडे गेल्याचे चित्र आहे. भाजपचे समन्वयक नितीन भुतडा यांच्या नेतृत्वात शासकीय विश्रामगृहावर झालेल्या गोपनीय बैठकीत सत्तासमीकरण स्पष्ट झाले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
या बैठकीत सर्वानुमते ठरलेल्या नगरसेकेस नगराध्यक्षपदी बसविण्याची भूमिका भाजप गटबंधनाने घेतली आहे. “महागाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणारे नेतृत्व पुढे आणणार असून अध्यक्षपदाला योग्य न्याय देऊ,” अशी ग्वाही नितीन भुतडा यांनी दिली. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी घोडेबाजार होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.दुसरीकडे, अविश्वास ठरावानंतर काँग्रेस गटाने वास्तव स्वीकारत सकारात्मक भूमिका घेत विरोधी बाकावर बसण्याची तयारी दर्शविली आहे. “आमच्या विरोधातील कौल मान्य असून लोकहिताच्या मुद्द्यांवर आम्ही रचनात्मक विरोध करू,” असे काँग्रेसच्या गटनेत्यांनी स्पष्ट केले.
भाजप गटबंधनाने नगरपंचायतीचा उर्वरित कार्यकाळ एकत्रितपणे पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला असून शहराच्या पायाभूत सुविधा, विकासकामे आणि प्रशासनातील गती वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.एकूणच, नगराध्यक्षपदासाठीची रस्सीखेच संपुष्टात येत असून महागाव नगरपंचायतीत भाजप गटबंधनाचे वर्चस्व कायम राहण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. आगामी काळातील राजकीय घडामोडींकडे पाहता होणारी महाराध्यक्ष पदाची निवडप्रक्रिया भाजपसाठी अत्यंत यशस्वी अशी वाटचाल समजल्या जात आहे.
