शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर थेट संवाद; १४ मार्चला पुसदमध्ये किसान सभेचा भव्य मेळावा

लोकवेध न्यूज नेटवर्क
पुसद : –
राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे प्रदेश अध्यक्ष ॲड. वसंत मनकर यांचा शनिवार, १४ मार्च रोजी पुसद येथे दौरा आयोजित करण्यात आला असून या भेटीदरम्यान ते परिसरातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या विविध समस्या व अडचणी जाणून घेणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढण्याच्या उद्देशाने हा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक भवन, शनी मंदिराच्या मागे, पुसद येथे पार पडणार असून पुसद, उमरखेड व महागाव तालुक्यातील किसान सभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या कार्यक्रमाला राज्यमंत्री इंद्रनील नाईक व पुसद नगराध्यक्ष मोहिनी ताई नाईक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच किसान सभेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. राजीव भांगे पाटील, प्रदेश सरचिटणीस डॉ. गणेश डोंगरे, राज्य समन्वयक डॉ. मंगेश देशमुख, विदर्भ प्रमुख जगदीश जूनगरी, यवतमाळ जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील कामरकर, जिल्हाध्यक्ष गजानन पाटील चंद्रवंशी, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. विकास पारध यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
या शेतकरी संवाद मेळाव्यास परिसरातील शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन किसान सभेचे जिल्हाध्यक्ष गजानन पाटील चंद्रवंशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
