भुकेचा केंद्रबिंदू”ला नामदेव ढसाळ पुरस्कार जाहीर  सलग पाचव्या राज्यस्तरीय पुरस्काराने होणार सन्मान

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / १५ फेब्रुवारी 

महागाव:- 

विद्रोह आणि सामाजिक जाणिवांचा ठळक आविष्कार म्हणून साहित्यविश्वात दखल घेतलेल्या “भुकेचा केंद्रबिंदू” या ग़ज़ल संग्रहास आशादिप उत्तेजनार्थ राज्यस्तरीय कवितासंग्रह (नामदेव ढसाळ पुरस्कार) २०२६ जाहीर झाला आहे. स्मृतीशेष डी. एस. घोडेस्वार यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या परिवारातर्फे आयोजित आशादिप राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार २०२६ चे निकाल नुकतेच घोषित करण्यात आले.

या पुरस्कारासाठी राज्यभरातून साहित्यिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ६५ साहित्यकृती निवड समितीकडे प्राप्त झाल्या होत्या. अत्यंत पारदर्शक व निःपक्षपाती पद्धतीने परीक्षण करून विविध साहित्यप्रकारांतील उत्कृष्ट ग्रंथांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा २६ एप्रिल २०२६ रोजी भुसावळ येथे आयोजित करण्यात आला असून, यानिमित्त ‘बाप’ या विषयावर आधारित कवी संमेलनाचे आयोजनही करण्यात आले आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. जतीन मेढे (जळगाव), मिलिंद बागुल (जळगाव), प्रा. वा. ना. आंधळे (एरंडोल), प्रा. व. सु. वले (पाचोरा) यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच दै. दिव्य मराठीचे संपादक आनंदा पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.

गेल्या नऊ महिन्यांत “भुकेचा केंद्रबिंदू” या संग्रहाला मिळणारा हा पाचवा राज्यस्तरीय पुरस्कार आहे. यापूर्वी या ग़ज़ल संग्रहास स्व. व्यंकटराव देशमुख स्मृती ग़ज़ल गुंफन पुरस्कार, शेगाव बुद्रुक येथील कवितेच्या घराचा बापुरावजी पेटकर राज्यस्तरीय ग़ज़ल पुरस्कार, हिमायतनगर येथील राज्यस्तरीय संवेदना सर्वोत्कृष्ट ग़ज़ल संग्रह पुरस्कार तसेच नागपूर येथील साहित्य विहार संस्थेचा सर्वोत्कृष्ट ग़ज़ल संग्रह पुरस्कार असे मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आता नामदेव ढसाळ उत्कृष्ट पुरस्काराची या संग्रहावर मोहोर उमटली आहे. या संग्रहात शंभर ग़ज़लांचा समावेश असून भूक, बेरोजगारी, गरीबी, जातीय विद्वेष, धार्मिक कट्टरता, अंधश्रद्धा, शेतकरी आत्महत्या अशा ज्वलंत सामाजिक प्रश्नांची सखोल व संवेदनशील मांडणी गजानन वाघमारे यांच्या ग़ज़लेतून प्रत्ययास येते. दरम्यान, यंदाच्या आशादिप राज्यस्तरीय उत्कृष्ट उत्तेजनार्थ पुरस्कारानिमित्त भुसावळ येथे होणाऱ्या साहित्यिक महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवी-कवयित्रींनी प्रज्ञा हंसराज बागुल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या