सवनाची अवनी देशपातळीवर झळकली; डेफ टेबल टेनिस स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई

लोकवेध न्यूज नेटवर्क / ०४ एप्रिल
महागाव :-
भारत सरकारच्या वतीने चंदीगड येथे २५ व २६ मार्च २०२६ दरम्यान आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ज्युनियर–सब ज्युनियर डेफ टेबल टेनिस स्पर्धेत महागाव तालुक्यातील सवना येथील कु. अवनी ढेपे हिने उल्लेखनीय कामगिरी करत रौप्यपदक पटकावले.
अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या अवनी ढेपे व पश्चिम बंगालच्या लघुदीचा दास यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. बेस्ट ऑफ फाईव्ह’ या स्वरूपात झालेल्या या सामन्यात अवनीने जोरदार झुंज दिली; मात्र २-३ अशा फरकाने तिला पराभव स्वीकारावा लागला. तरीही तिने राष्ट्रीय स्तरावर रौप्यपदक मिळवून आपली दमदार छाप सोडली.
अवनीने पुसद येथील पी.आर. स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये सराव केला असून कोच अविनाश देशपांडे सर व प्रसाद देशपांडे यांचे तिला मार्गदर्शन लाभले.ती यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,सवना येथील इयत्ता नववीची विद्यार्थिनी आहे.
या यशामागे विद्यालयाचे चेअरमन सुभाषराव देशमुख सवनेकर, प्राचार्य माया राऊत तसेच वर्ग शिक्षिका श्रद्धा देशमुख यांचेही मोलाचे योगदान आहे. खेळासोबतच अभ्यासाचीही योग्य सांगड घालून त्यांनी अवनीला प्रोत्साहन दिले.
अवनीच्या या यशाचे श्री शिवाजी शिक्षण संस्था,पुसदचे माजी अध्यक्ष विजयराव पाटील चोंढीकर, अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर, सचिव अश्विनीताई पाटील चोंढीकर तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
