“हंगर”च्या भावस्पर्शी नृत्यातून संदेश; विशेष विद्यार्थ्यांची जिल्ह्यात दमदार झेप

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / १३ फेब्रुवारी
पुसद : –
जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या वतीने २ ते ४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग मुला–मुलींच्या सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमध्ये श्री देव निवासी मतिमंद विद्यालय, पुसदच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत शाळेचा नावलौकिक उंचावला.
सांस्कृतिक विभागात विद्यार्थ्यांनी सादर केलेले “हंगर (भूक)” या सामाजिक विषयावर आधारित नृत्य सादरीकरण विशेष ठरले. विषयाची प्रभावी मांडणी, भावपूर्ण अभिव्यक्ती आणि कलात्मक सादरीकरणामुळे परीक्षक भारावले आणि या सादरीकरणाला प्रथम क्रमांक मिळाला. सामाजिक जाणीव जागृत करणारा हा प्रयोग स्पर्धेतील सर्वोत्तम ठरल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
क्रीडा विभागातही विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत अनेक पदके पटकावली. प्रणव राजेश उगले याने स्पॉट जंपमध्ये प्रथम क्रमांक मिळवला, नैतिक मारोती कळंबे याने सॉफ्ट बॉल थ्रोमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. पीयुष उद्दल राठोड (१०० मीटर धावणे), शिवराज संतोष दांडेगावकर (गोळाफेक) आणि श्रेयस सिद्धार्थ कांबळे (स्पॉट जंप) यांनी प्रत्येकी तृतीय क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले.
या यशाबद्दल जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करत, विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांनी कला आणि क्रीडा क्षेत्रात दाखवलेली कामगिरी समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
शाळा प्रशासन, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रशिक्षकांची मेहनत आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या कामगिरीमुळे विशेष विद्यार्थ्यांच्या क्षमतांविषयी समाजात सकारात्मक दृष्टिकोन अधिक दृढ झाला असून शाळेच्या कार्याला नवी दिशा मिळाल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
