‘गण गणात बोते’च्या गजरात प्रगटला गजाननांचा सोहळा

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क /१० फेब्रुवारी
उमरखेड :-
श्रद्धेच्या वाटेवर चालणाऱ्या पोफाळी नगरीत दि. ८ फेब्रुवारी रोजी संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचा भक्तिरसात न्हालेला सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दि. १ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत चाललेल्या सातदिवसीय उत्सवाने संपूर्ण गाव अध्यात्माच्या सुगंधाने दरवळून निघाले.या काळात दररोज पहाटे श्रींचा अभिषेक व पारायण, दुपारी श्रीमद्‌भागवत कथा, तर सायंकाळी हरिपाठ, कीर्तन व प्रवचन झाले. संतवाणीच्या गजरात मनोमन भक्ती जागी झाली, तर हरिनामाच्या लयीने गावाचा श्वासच बदलून गेला.प्रगट दिनी सकाळी श्री गजानन महाराजांची पालखी गावातून निघाली. घरोघरी पूजन झाले, डोळ्यांत श्रद्धा आणि ओठांवर नाम होता. दुपारी काल्याचे कीर्तन पार पडले. त्यानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
या महाप्रसादासाठी पोफाळी, जनुना, गंगणमाळ, अंबाळी, कळमुला, तरोडा, पळशी, दिवट, पिंपरी, कुपटी, मुळावा, तिवरंग, झाडगाव, नागापूर,मरसुळ व उमरखेड येथून आलेल्या हजारो भाविकांनी रांगा लावल्या. मंदिराच्या सभागृहात महिला, पुरुष, वृद्ध व बालकांनी भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेतला.‘गण गणात बोते’च्या जयघोषाने पोफाळी नगरी दुमदुमून गेली होती.
भाविकांचा उसळलेला जनसागर पाहता, जणू शेगावचा गजानन महाराज क्षणभरासाठी पोफाळीत अवतरल्याचा भास होत होता. श्रद्धा, समाधान आणि शांती यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थानचे अध्यक्ष संतोष ठाकरे, तसेच गणेशराव शिलार, विनायक मुळावकर, राजेंद्र क्षिरसागर, अरुण ठाकरे आदींनी अथक परिश्रम घेतले. ग्रामस्थ व पंचकोशीतील असंख्य भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.नाम, सेवा आणि संतपरंपरेचा जागर करणारा हा प्रगट दिन सोहळा भाविकांच्या अंतःकरणात श्रद्धेचा ठसा उमटवून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या