पालखी सोहळ्यासह १ लाख २८ हजार तुपदीपांचा भव्य सामूहिक दिपोत्सव मरसुळ–दत्तनगरमध्ये नामस्मरण पूर्णत्वाचा भक्तिभावपूर्ण उत्सव संपन्न

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
उमरखेड :-
मरसुळ–दत्तनगर येथील भाविकांनी एकत्रितपणे साडेतीन कोटी नामस्मरणाचा संकल्प यशस्वीपणे पूर्णत्वाकडे नेल्याच्या आनंदात ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले तब्बल १ लाख २८ हजार तुपदीपांचा सामूहिक दिपोत्सव, जो अत्यंत भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
समारोपीय दिवशी प्रभु दत्तात्रयांची पालखी संपूर्ण गावातून भक्तिमय वातावरणात प्रदक्षिणेसाठी काढण्यात आली. तुपदीप प्रज्वलनानंतर गुरुवारी सायंकाळी संपूर्ण गाव दिवाळीसारख्या प्रकाशाने उजळून निघाले होते. प्रत्येक घरासमोर प्रज्वलित तुपदीपांनी संपूर्ण गावात भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
२ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी महापूजेला सुरुवात झाली. ५ फेब्रुवारी रोजी गुरुवारी दत्तमहाराज, हनुमान व महादेव यांचे विधीवत अभिषेक पार पडले. दुपारी १ ते ४ या वेळेत महाआरती झाली. त्यानंतर पालखी नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. या पालखी सोहळ्यात महिलाभाविकांची विशेष उपस्थिती लक्षणीय होती.
महापूजेनंतर उत्तररात्री व पहाटे नामसंकल्प उजळणी कार्यक्रम गुरुवर्य भगवानगीर महाराज यांच्या उपस्थितीत पार पडला. प्रभु दत्तात्रय मंदिराच्या सभागृहात काकडा आरतीने या तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचा भक्तिभावपूर्ण समारोप झाला.या संपूर्ण उपक्रमात गावातील भजनी मंडळे तसेच नागरिकांनी आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढत मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग नोंदविला. सामूहिक श्रद्धा, एकात्मता आणि नामस्मरणाच्या बळावर साकारलेला हा दिपोत्सव भाविकांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरला.
