धम्म, समता आणि प्रबोधनाचा महासंगम; महागावात १० वी भव्य बौद्ध धम्म परिषद २१–२२ फेब्रुवारीला

लोकवेध न्यूज नेटवर्क / १६ फेब्रुवारी

महागाव :

समता, करुणा आणि प्रज्ञेचा संदेश देणाऱ्या १० व्या भव्य बौद्ध धम्म परिषदेची महागावात जय्यत तयारी पूर्ण झाली असून २१ व २२ फेब्रुवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विस्तीर्ण प्रांगणात धम्ममय सोहळा रंगणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था, महागाव यांच्या वतीने आयोजित या परिषदेबाबत परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. देशभरातील भिक्खू संघ, विचारवंत, प्रबोधनकार तसेच नामवंत गायक-कलावंतांच्या उपस्थितीमुळे यंदाची परिषद ऐतिहासिक ठरणार आहे.

शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत धम्मध्वजारोहण, शील ग्रहण व उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. धम्मध्वजारोहणाचा मान भदंत सुबोध स्थविर यांना लाभणार असून उद्घाटन भदंत अश्वजित स्थविर यांच्या हस्ते होईल. मोर्शी येथील भदंत कौंडण्य स्थविर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. परिषदेचे अध्यक्ष साहेबराव कांबळे तर स्वागताध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे दराटीकर मार्गदर्शन करतील.

दुपारी २ ते सायंकाळी ७ या वेळेत भिक्खू संघाकडून धम्मदेशना होणार असून त्रिशरण-पंचशील, बुद्धांचे धम्मतत्त्व, नैतिक मूल्यांची जपणूक, तरुणाईचे प्रबोधन आणि समतामूल्यांची रुजवण यावर विशेष भर दिला जाणार आहे.शनिवारी रात्री ७ ते १० या वेळेत ‘भीम व बुद्ध गीतांचा महासंग्राम’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून अजय दहाडे, अंजली गडपाले, निशाताई घोंगडे, भाग्यश्री इंगळे आणि वसंत आडे यांची सादरीकरणे धम्मप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहेत.

रविवार, २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ शील ग्रहण व धम्मदेशना होईल. दुपारी १ ते ४ या वेळेत विशेष व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून प्रा. डॉ. अनिल काळबांडे (उमरखेड), ॲड. महादेव कांबळे (सांगोला) आणि आंतरराष्ट्रीय बाल प्रबोधनकार कुमारी प्रिया नप्ते मार्गदर्शन करतील.

परिषदेला येणाऱ्या बौद्ध उपासक-उपासिकांनी शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. धम्म, समता आणि बंधुभावाचा संदेश देणारी ही परिषद महागावच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनात नवचैतन्य निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या