मृत्यूच्या दारातून मॅरेथॉनच्या ट्रॅकवर : विडुळचा जिगरबाज पराग लिगदे बनला कॅन्सरवर मात करणारा प्रेरणास्त्रोत

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / १८ फेब्रुवारी
उमरखेड :-
विडुळ (ता. उमरखेड) येथील मूळ रहिवासी आणि सध्या छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास असलेला पराग श्रीनिवास लिगदे हा कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात करून मॅरेथॉनच्या मैदानात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा जिगरबाज धावपटू ठरला आहे. “जिंदगी की दौड में रहो कॅन्सर से दो कदम आगे, इंडिया को जिताना है, कॅन्सर को हराना है” हा त्याचा जिद्दीचा संदेश आज अनेक रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे.
अवघ्या सहाव्या वर्षी परागला ब्रेन ट्यूमर (हायपोथॅलेमिक ग्लायोमा – NF1) असल्याचे निदान झाले. जानेवारी २०११ पासून मुंबई येथे त्याच्यावर दीर्घकाळ उपचार सुरू राहिले. दर आठवड्याला केमोथेरपी, हार्मोन्स इंजेक्शन, १७ एमआरआय, अनेक एक्स-रे व डेक्सा स्कॅन अशा कठीण वैद्यकीय प्रक्रियांना त्याने सामोरे जावे लागले. दोन वर्षे तो पूर्णपणे खाटेवर होता; स्वतः उभे राहणे किंवा चालणेही शक्य नव्हते.
२४ मे २०१६ रोजी झालेल्या ब्रेन सर्जरीनंतर सात ते आठ महिने फिजिओथेरपी करून त्याने पुन्हा चालण्याचा प्रवास सुरू केला. “मी पहिल्यांदा स्वतःच्या पायावर उभा राहिलो तेव्हा आई-बाबांच्या डोळ्यात आलेले आनंदाश्रू हीच माझी खरी कमाई,” असे पराग भावूक होत सांगतो.
अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीतही आई-वडील श्रीनिवास व वैशाली लिगदे यांनी उपचारात कोणतीही तडजोड केली नाही. व्हीलचेअरवरून फिरवणे, रात्रभर मांडीवर घेऊन बसणे, सतत धीर देणे,या त्यांच्या त्यागामुळेच पराग पुन्हा उभा राहू शकला.आज २१ वर्षीय परागने ५० पेक्षा अधिक मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केल्या आहेत. २०मध्ये लोकमत महामॅरेथॉनपासून त्याच्या धावण्याची सुरुवात झाली. त्यानंतर टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनसह अनेक स्पर्धांमध्ये तो सहभागी झाला असून काही ठिकाणी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणूनही काम पाहत आहे.
⬛ परागचा संदेश
“कॅन्सरला घाबरू नका. वेळेवर उपचार झाले तर हा आजार बरा होऊ शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक रहा आणि जीवनाची शर्यत सुरू ठेवा.”
कॅन्सरवर मात करून मॅरेथॉन धावपटू बनलेला विडुळचा हा तरुण आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्याच्या जिद्दीला आणि त्यागी पालकांच्या संघर्षाला परिसरातून सलाम केला जात असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
