महागावच्या सत्तेचा निकाल सोमवारी; अविश्वास ठरावावर निर्णायक मतदान

लोकवेध न्यूज नेटवर्क / १३ फेब्रुवारी

महागाव : – 

महागाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सुनंदा दिलीप सुरोशे कोपरकर यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर येत्या सोमवारी, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभा होणार आहे. उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत सभागृहात ही बैठक पार पडणार असून या सभेकडे संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम ३४१(ब)-५ नुसार ही विशेष सभा बोलावण्यात आली आहे. तसेच कलम ३४९-५ अन्वये सखाराम मुळे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नगरसेवकांना अधिकृत नोटीस देण्यात आली असून ठरावावर चर्चा करून मतदानाद्वारे अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

महागाव नगरपंचायतीत सध्या सत्तांतराची शक्यता निर्माण झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. अविश्वास ठरावाचा निकाल लागल्यानंतर पुढील नगराध्यक्ष कोण होणार यावरच सर्व समीकरणे ठरणार असल्याने दोन्ही गटांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. ऐनवेळी एखाद्या नगरसेवकाची भूमिका बदलल्यास संख्याबळाचे गणित उलटण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

नव्या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून रंजना आडे तर काँग्रेसच्या जयश्री संजय नरवाडे यांची नावे चर्चेत आहेत. तर उपाध्यक्ष पदासाठी विशाल पांडे यांच्या नावाची चर्चा रंगत आहे.अध्यक्ष पदासाठी मात्र त्यात नरवाडे यांच्या नावाला सध्या अधिक पाठिंबा मिळत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

सोमवारी होणाऱ्या मतदानानंतर महागाव नगरपंचायतीतील सत्तेचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ही सभा केवळ अविश्वास ठरावापुरती मर्यादित नसून नव्या सत्तासमीकरणाच्या प्रारंभाचा निर्णायक टप्पा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या