महागाव नगरपंचायतीत सत्तेची उलथापालथ अटळ ? अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव; उपनगराध्यक्षांसह १२ नगरसेवकांची बंडखोरी

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव :-
महागाव नगरपंचायतीतील सत्तासंघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून नगरपंचायतीच्या अध्यक्षा सौ.सुनंदा दिलीप सुरोशे (कोपरकर) यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. नगरपंचायत सभागृहातील तब्बल १२ नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याकडे अविश्वास ठराव सादर केल्याने महागावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
या घडामोडींमुळे नगरपंचायतीतील सत्ताधारी गटात तीव्र फूट पडल्याचे स्पष्ट झाले असून भाजप, शिवसेना आणि काँग्रेसमधील काही नगरसेवकांनी एकत्र येत अध्यक्षांविरोधात उघड भूमिका घेतली आहे. भाजपाचे गजानन सोपान साबळे, सुरेश उत्तमराव नरवाडे, सौ. रंजना दीपक आडे, सौ. आशा शंकर बावणे, शिवसेनेचे प्रमोद उर्फ शाका भरवाडे, रामराव काशिनाथ नरवाडे, विशाल प्रकाश पांडे, सौ. सुनीता शिवाजी डाखोरे, सौ. करुणा नारायण शिरबिरे तसेच काँग्रेसचे मो. परवेज शफी सुरैया, सौ. जयश्री अशोक इंगोले आणि सौ. जयश्री संजय नरवाडे यांनी अविश्वास ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे उपनगराध्यक्ष प्रमोद उर्फ शाखा भरवाडे यांनी स्वतः अध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावावर स्वाक्षरी करत थेट जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थिती लावली.यामुळे नगरपंचायतीतील अंतर्गत नाराजी,सत्ताधाऱ्यांमधील अविश्वास आणि फाटाफूट चव्हाट्यावर आली आहे.
महागाव नगरपंचायत सभागृहात एकूण १७ नगरसेवक असून सध्या अध्यक्षांच्या विरोधात १२ नगरसेवक उभे असल्याचा दावा करण्यात येत आहे, तर अध्यक्षांच्या बाजूने केवळ ५ नगरसेवक असल्याचे बोलले जात आहे. मात्र अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी १३ नगरसेवकांचे समर्थन आवश्यक असल्याचे सांगितले जात असून, ही संख्या पूर्ण होणार की नाही याबाबत राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण आहे.दरम्यान, भाजप नेत्यांकडून तेरा पेक्षा कमी संख्या होणार नसल्याची खात्रीलायक माहिती देण्यात येत असून अविश्वास ठराव मंजूर झाल्यास महागाव नगरपंचायतीत भाजपची सत्ता स्थापन होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.अविश्वास ठरावावर प्रत्यक्ष मतदान कधी होणार, कोणत्या नियमांनुसार निर्णय घेतला जाणार आणि अंतिम सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून महागावच्या राजकारणात पुढील घडामोडींविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
