महागाव नगर पंचायतचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात अध्यक्षांच्या गैरव्यवहाराची जिल्हास्तरीय चौकशी; महागवात राजकारण तापले
⚫लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव:-
महागाव नगर पंचायतमध्ये गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या कथित गैरकारभारावर अखेर जिल्हा प्रशासनाने ठोस पाऊल उचलले आहे. अध्यक्षांनी २५ ऑगस्ट २०२३ पासून केलेल्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांनी दिले असून, यासाठी विशेष जिल्हास्तरीय चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.
महागाव नगर पंचायतमध्ये सत्ताधारी गटाचीच सत्ता असतानाही कारभारावर कुणाचेच नियंत्रण नसल्याचे आरोप सातत्याने होत होते. विकास कामे फक्त कागदावर, प्रत्यक्षात कामे अपूर्ण, निधी कुठे खर्च झाला याचा हिशोब नाही आणि निर्णयात मनमानी सुरू असल्याचा संताप नागरिकांमध्ये वाढत होता. या तक्रारींकडे दुर्लक्ष करता येणार नाही, हे लक्षात आल्याने अखेर शासन स्तरावरून चौकशीचे आदेश निघाले.
नगर विकास विभाग, मंत्रालय तसेच नगर पंचायत मुख्याधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी थेट चौकशी समिती नेमली आहे. या समितीकडून अध्यक्षांच्या कार्यकाळातील सर्व निर्णय, खर्च, निविदा प्रक्रिया, विकास कामांची देयके आणि प्रशासकीय फाईल्स तपासल्या जाणार आहेत.
या चौकशीमुळे महागावच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी गट अडचणीत आला असून, विरोधक आक्रमक झाले आहेत. नगर पंचायत जनतेसाठी होती की काही मोजक्यांसाठी ? असा थेट सवाल आता शहरातील जनता विचारत आहे.
जिल्हा प्रशासनाने मुख्याधिकाऱ्यांना सर्व कागदपत्रे चौकशी समितीसमोर सादर करण्याचे स्पष्ट आदेश दिले असून, सहकार्य न केल्यास कारवाईचे संकेतही देण्यात आले आहेत.ही चौकशी केवळ कागदापुरती मर्यादित राहणार की खरोखर दोषींवर कारवाई होणार, अध्यक्षपद धोक्यात येणार का, याकडे संपूर्ण महागाव तालुक्याचे लक्ष लागले आहे.सत्य बाहेर येणार की प्रकरण नेहमीप्रमाणे दडपले जाणार,हा प्रश्न आज सर्वसामान्य जनतेत उघडपणे चर्चिला जात आहे
