महागावमध्ये सत्तेची अखेरची लढत; व्हीप विरुद्ध बंडखोरी, न्यायालयीन हालचालींमध्ये भाजपची आक्रमक तयारी

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क 

महागाव : – 

 

महागाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सुनंदा दिलीप सुरोशे कोपरकर यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर सोमवार, १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेत मतदान होणार असून महागावच्या सत्तेचा अंतिम कौल लागणार आहे. उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून सत्ताधाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विरोधकांनी सत्तांतरासाठी आवश्यक आकडेमोड पूर्ण केल्याचा दावा करत आक्रमक भूमिका घेतली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बोलावलेल्या या सभेत ठरावावर चर्चा झाल्यानंतर थेट मतदान होणार आहे. अविश्वास ठराव मंजूर झाल्यास नगराध्यक्षपद तात्काळ रिक्त होऊन नव्या सत्तासमीकरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे ही बैठक केवळ औपचारिक न राहता सत्तेचा निर्णायक सामना ठरणार आहे.

नगरपंचायतीत सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी गटांकडून नगरसेवकांना आमिष देऊन आणि मनधरणी करण्याचा मोठा प्रयत्न केल्या जात असला तरी हा प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.त्यामुळे मतदानापूर्वीच तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

काँग्रेस गटनेते तथा माजी उपनगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक शैलेश कोपरकर यांनी पक्षादेश जारी करून सर्व सदस्यांना अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करण्याचे व्हिप द्वारे निर्देश दिले आहेत. मात्र काँग्रेसमधील अंतर्गत विसंवाद, स्थानिक गटबाजी आणि काही सदस्यांची नाराजी यामुळे हा व्हीप प्रभावी ठरणार नाही. काँग्रेसचे नगरसेवक व्हीप झुगारून स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांमुळे सत्ता बदल अटळ मानल्या जात आहे.त्यांमुळे सत्ताधारी गटाची चिंता वाढली आहे.

दरम्यान सत्ताधाऱ्यांनी या प्रक्रियेविरोधात न्यायालयाचे दार ठोठावल्याची माहिती पुढे येत असली तरी अंतिम निकाल सभागृहातील आकडेमोडीवरच ठरणार आहे. न्यायालयीन हालचाली, व्हीप आणि संभाव्य बंडखोरी यांच्या छायेत महागावची सत्ता उभी आहे. त्यामुळे आता भाजपकडे खरे बहुमत वाढतांना दिसून येत असून हे, उद्याच्या मतदानातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे “दूध का दूध, पाणी का पाणी” होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, काँग्रेसच्या मतांत मोठी फूट पडल्याने अविश्वास ठराव पारित होण्याची दाट शक्यता वाढली आहे.नव्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून रंजना आडे यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी पुढे येत असून काँग्रेसकडून जयश्री नरवाडे यांना पर्याय म्हणून पाहिले जात आहे. यात मात्र बहुमत कोणाकडे जाते यावरच पुढील नेतृत्व निश्चित होणार आहे.

उद्याचे मतदान महागावच्या राजकारणातील टर्निंग पॉईंट ठरणार असून पक्षनिष्ठा, गटबाजी आणि स्थानिक समीकरणांचा खरा कस लागणार आहे. सत्तेची बाजी कोण जिंकणार याचा निकाल या सभेत लागणार असून महागावच्या पुढील राजकीय दिशेचा निर्णयही त्यातूनच होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या