महागाव नगरपंचायतीत सत्तांतर; ‘जे पेरले तेच उगवले’, भुतडा गटाचे वर्चस्व स्पष्ट

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / १६ फेब्रुवारी
महागाव :
महागाव नगरपंचायतीत काँग्रेस महाविकास आघाडीची सत्ता कोसळत नगराध्यक्ष सुनंदा दिलीप सुरोशे कोपरकर यांच्याविरोधातील अविश्वास ठराव १२ विरुद्ध शून्य मतांनी मंजूर झाला. ठराव पारित होताच कोपरकर यांना पदत्याग करावा लागला. या घडामोडीनंतर नगरपंचायतीत भुतडा गटाचे वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मतदानापूर्वी सभागृह परिसरात दोन्ही गटांचे शक्तीप्रदर्शन झाले. तणावपूर्ण वातावरणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पराभव निश्चित असल्याचे लक्षात येताच कोपरकर गटाने सभागृहातून माघार घेतली. त्यामुळे नगराध्यक्ष सुनंदा कोपरकर, गटनेते शैलेश कोपरकर, सुरेखा कोपरकर, रुपाली कोल्हेकर व महेश पाटील हे मतदानावेळी अनुपस्थित राहिले. पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांनी अविश्वास ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली.
नगराध्यक्षांविरोधात भाजप, शिवसेना तसेच काँग्रेसमधील नाराज नगरसेवक एकत्र आले. भाजपचे गटनेते गजानन साबळे, माजी उपनगराध्यक्ष सुरेश नरवाडे, रंजना आडे, आशा बावणे, शिवसेनेचे उपनगराध्यक्ष प्रमोद उर्फ शाका भरवाडे, रामराव नरवाडे, युवा सेनेचे विशाल पांडे, सुनीता डाखोरे, करुणा शिरबिरे यांच्यासह काँग्रेसचे मो. परवेज शफी सुरैया, जयश्री इंगोले व जयश्री नरवाडे या १२ नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले.
काँग्रेस गटनेते शैलेश कोपरकर यांच्या मनमानी कारभारामुळे सत्तेतीलच नगरसेवक नाराज झाले आणि विरोधकांना संधी मिळाली, अशी चर्चा आहे. अविश्वास प्रस्तावात त्रुटी असल्याचा दावा करत नगराध्यक्षांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती; मात्र न्यायालयाने सकाळीच याचिका निकाली काढल्याने ठरावाचा मार्ग मोकळा झाला.
प्रस्ताव दाखल झाल्यानंतर काही नगरसेवक पर्यटनाला गेल्याची चर्चा होती. संपर्काबाहेर असलेल्या नगरसेवकांचा शोध घेण्यासाठी हालचाली झाल्या; मात्र ते थेट मतदानावेळी सभागृहात दाखल झाले. महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे यांनी पक्षादेश धुडकावून ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यांची समजूत काढण्यासाठी पक्षाचे जिल्हा पदाधिकारी प्रयत्नशील होते; मात्र “कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न” सांगत त्यांनी आपला निर्णय कायम ठेवला.
पूर्वी सत्तेसाठी इतर गटांतील नगरसेवक फोडून सत्ता काबीज करण्याची रणनीती वापरल्याची चर्चा होती. त्याच फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका यावेळी कोपरकर गटालाच बसल्याने “जे पेरले तेच उगवले” अशी प्रतिक्रिया विरोधकांकडून व्यक्त होत आहे. या सत्तांतरानंतर नगरपंचायतीतील राजकीय सूत्रे भुतडा गटाच्या हातात गेल्याचे स्पष्ट झाल्याची चर्चा सुरू आहे.
मागील अडीच वर्षांत शहरातील विकासकामे रखडल्याचा आरोप करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येत सत्ताबदल घडवून आणल्याचा दावा भाजप गटनेते गजानन साबळे यांनी केला आहे. येत्या काळात शहराच्या विकासाला गती देणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महागाव नगरपंचायतीत आता नवीन नगराध्यक्ष निवडीसाठी हालचाली सुरू होणार असून पुढील सत्तासमीकरणांकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
