उमरखेड नगरपरिषदेत स्थानिक विषय समित्यांची निवड पूर्ण; जनशक्ती पॅनलकडून शहर विकासाला गती देण्याचा निर्धार

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
उमरखेड :
उमरखेड नगरपरिषदेत जनशक्ती पॅनलची सत्ता स्थापन झाल्यानंतर नगरपरिषदेच्या कामकाजाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. गुरुवारी (२२ जानेवारी) नगरपरिषद सभागृहात विविध स्थानिक विषय समित्यांच्या निवडी पार पडल्या. या निवडीमुळे शहरातील रखडलेले विकास प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जनशक्ती पॅनलच्या वतीने विषय समित्यांच्या अध्यक्षपदी पुढीलप्रमाणे निवडी करण्यात आल्या.आरोग्य समिती अध्यक्ष वीरेंद्र खंदारे,बांधकाम समिती अध्यक्ष प्रकाश शिकारे,महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष फरजाना रहीम,
पाणीपुरवठा समिती अध्यक्ष स्वाती ठाकरे,शिक्षण समिती अध्यक्ष रसूल पटेल,नियोजन समिती अध्यक्ष जुबेर कुरेशी,या सर्व समित्यांवर शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, रस्ते, शिक्षण व मूलभूत सोयीसुविधांशी संबंधित गंभीर जबाबदारी असणार आहे.अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांची कसोटी लागणार आहे.
नगराध्यक्षा तेजश्री जैन यांच्या नेतृत्वाखाली शहर विकास व स्वच्छता मोहिम कशी राबवली जाते, याकडे उमरखेड शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी जनशक्ती पॅनलमध्ये काँग्रेस, उबाठा तसेच विदर्भ मराठवाडा समिती यांचा समावेश आहे.यावेळी नंदकिशोर अग्रवाल,ॲड. संतोष जैन, दतराव शिंदे, बाळासाहेब नाईक, गोपाल अग्रवाल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.नगरपरिषदेच्या नव्या समित्यांमुळे उमरखेड शहराचा विकास वेग घेईल,अशी आशा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
