शब्दांपलीकडची श्रद्धांजली ! महागाव तालुक्याने स्व. अजितदादा पवारांना दिला मानवतेचा मान ,गरजू व अपंगांना ब्लँकेट वाटपातून जपली सामाजिक बांधिलकी

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव :-
लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानंतर संपूर्ण महागाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर महागाव तालुक्याच्या वतीने आयोजित शोकसभेत स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मात्र ही श्रद्धांजली केवळ शब्दांपुरती न ठेवता, त्यांच्या जनसेवेच्या विचारांना कृतीत उतरवत गरजू व अपंग बांधवांना ब्लँकेट वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षपद भगवानराव राऊत यांनी भूषविले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दादांच्या राजकीय, सामाजिक व जनहितकारी कार्याचा गौरव करत त्यांच्या कार्याची आठवण काढली. दादांचे नेतृत्व समाजाला दिशा देणारे होते; त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही, असे भावनिक उद्गार यावेळी व्यक्त करण्यात आले.
जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांच्या पुढाकारातून या शोकसभेला सामाजिक आशय देण्यात आला.थंडीच्या पार्श्वभूमीवर गरजू व अपंग नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करून ‘जनसेवा’ हा दादांचा विचार प्रत्यक्ष कृतीतून जिवंत ठेवण्यात आला.या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या शोकसभेत नितीन भुतडा (जिल्हा समन्वयक, भाजप, गटविकास अधिकारी दत्तात्रय कदम, ठाणेदार धनराज निळे,सपोनी अमोल राठोड,सचिन नाईक ज्येष्ठ नेते, काँग्रेस,महेंद्र कावळे सर, डी. बी. नाईक, देविदास मोहकर,अरविंद सोळंके,अतुल शिंदे आदींनी आपल्या भाषणातून स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेजस नरवाडे, संजय गावंडे, विवेक नरवाडे, स्वप्निल व प्रतीक नरवाडे, केदार जोशी, शंकरराव नरवाडे, जगदीश महाराज, साहेबराव पाटील ढोले, निलेश मस्के यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————————————————————
शासन निर्णय बदलवणारे ‘धाडसी’ नेतृत्व म्हणजे दादा
उमरखेड तालुका पुसद उपविभागात आणि महागाव तालुका दिग्रस उपविभागात समाविष्ट करण्याची अधिसूचना निघाल्यानंतर तालुक्यात तीव्र असंतोष होता. तत्कालीन खासदार सुभाषराव वानखेडे व आमदार विजयराव खडसे यांच्यासह आम्ही अजितदादांची मंत्रालयात भेट घेतली. त्यांनी वस्तुस्थिती समजून घेत ‘हा निर्णय चुकीचा आहे’ असे ठाम सांगत तो शासन निर्णय बदलून उपविभाग पुन्हा उमरखेडला केला. शासन निर्णय फिरवण्याची ताकद असणारे ते खरे लोकनेते होते.
जगदीश नरवाडे, संस्थापक अध्यक्ष, जनआंदोलन आधार
संघर्ष समिती
