उमरखेडमध्ये जनशक्तीची पकड अधिक मजबूत ! उपाध्यक्षपदी जुबेर कुरेशी; अग्रवाल–नाईक स्वीकृत सदस्य पदी,भाजपला पुन्हा एक धक्का..

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क 

उमरखेड :

नगरपरिषद निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळवलेल्या जनशक्ती पॅनलने पहिल्याच अधिकृत बैठकीत आपले बहुमत ठामपणे सिद्ध केले.आज झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष पदी जुबेर कुरेशी यांची निवड करण्यात आली. तसेच नगरपरिषदेच्या कामकाजासाठी गोपाल अग्रवाल आणि बाळासाहेब नाईक यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार झालेल्या या निवड प्रक्रियेत जनशक्ती पॅनलकडून उपनगराध्यक्ष पदासाठी जुबेर कुरेशी यांचे नामांकन दाखल करण्यात आले. यावेळी भाजपकडून अमोल तिवरंगकर यांनी अर्ज दाखल करून चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला.परंतु सभागृहात जनशक्ती पॅनलकडे स्पष्ट बहुमत असल्याने ९ विरुद्ध १८ अशा मतांनी जुबेर कुरेशी यांचा ९ मतांनी विजय झाला.

दरम्यान हा निकाल निवड सभेच्या पीठासीन अधिकारी नगरपरिषद अध्यक्षा तेजश्री जैन आणि सहाय्यक म्हणून डॉ. अजय कुरवाडे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला.यानंतर पक्षीय ताकदीनुसार स्वीकृत सदस्यांची निवड झाली. जनशक्ती पॅनलकडून गोपाल अग्रवाल व बाळासाहेब नाईक, तर भाजपकडून विजय गुजरे यांच्या नावांना स्वीकृती देण्यात आली.

निवड जाहीर होताच नगरपरिषद परिसरात फटाके फोडून व बँडच्या गजरात जल्लोष करण्यात आला.समर्थकांनी घोषणा देत आनंद व्यक्त केला.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेस नेते तातू देशमुख, शहराध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल, ॲड. संतोष जैन,तालुकाध्यक्ष दत्तराव शिंदे, प्रेमराव वानखेडे,सेनेचे गजेंद्र ठाकरे यांच्यासह जनशक्ती पॅनलचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पहिल्याच बैठकीत सत्ता आणि संख्याबळ सिद्ध करत जनशक्ती पॅनलने उमरखेडच्या राजकारणात आपली पकड अधिक मजबूत केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या