नगराध्यक्षांचा कास्टिंग वोट भाजपसाठी ‘राजकीय चेकमेट’ ठरला; ढाणकीत दत्त दिगंबर वानखेडेंची उपनगराध्यक्षपदी धडाकेबाज एन्ट्री

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
ढाणकी :
ढाणकी नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर सत्ता-संघर्षाचा थरारक शेवट झाला. नगराध्यक्षांच्या निर्णायक कास्टिंग वोटने भाजपचा डाव पूर्णतः उलटवत ढाणकी नगर विकास आघाडीने सत्ता राखली आणि दत्त दिगंबर वानखेडे यांची उपनगराध्यक्षपदी निवड शिक्कामोर्तब केली.या निकालाने भारतीय जनता पक्ष सत्तेबाहेर फेकला गेला.
१७ सदस्यांच्या सभागृहात कोणालाही स्पष्ट बहुमत नसल्याने निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली.भाजपकडे ७ सदस्य असून दोन अपक्षांच्या पाठबळावर त्यांनी ९ चे संख्याबळ उभे केले होते.मात्र दुसरीकडे ढाणकी नगर विकास आघाडीकडे शिवसेना (शिंदे गट) (३), एम.आय.एम. (३), काँग्रेस (२) आणि नगराध्यक्ष असा मिळून तितकेच ९ सदस्य होते. परिणामी सत्ता-निर्णय नगराध्यक्षांच्या हातात गेला.
पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा अर्चना सुंदरकांता वासमवार यांनी आपल्या विशेष अधिकारातील कास्टिंग वोटचा वापर ढाणकी नगर विकास आघाडीच्या बाजूने केला आणि भाजपचे सत्तास्वप्न एका क्षणात भंगले. त्यानंतर दत्त दिगंबर वानखेडे यांच्या उपनगराध्यक्षपदी निवडीवर शिक्का बसला.
या बैठकीत मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांनी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व शिस्तबद्धरीत्या पार पाडली. उपाध्यक्ष निवडीबरोबरच स्वीकृत सदस्यांचीही घोषणा झाली असून भाजपकडून रोहित वर्मा तर ढाणकी नगर विकास आघाडीकडून संजय सल्लेवाड यांची निवड करण्यात आली.
________________________________________________
सत्ता हुकली, ढाणकीत जल्लोष!
सुरुवातीला अपक्षांच्या बळावर भाजप आघाडीवर असल्याचे चित्र होते. मात्र अंतिम क्षणी अचूक राजकीय खेळी करत ढाणकी नगर विकास आघाडीने बाजी मारली.निकाल जाहीर होताच ढाणकी शहरात वानखेडे समर्थकांनी जल्लोष करत विजय साजरा केला तर भाजपसाठी हा निकाल मोठा राजकीय धक्का ठरला.
