अविश्वासानंतर सत्ता उलटली! महागाव बाजार समितीच्या सभापतीपदी रवी पवार; राष्ट्रवादी (अजित पवार)–काँग्रेस व ॲड. गजेंद्र देशमुख यांची निर्णायक भूमिका

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव :
महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील दीर्घकाळ सुरू असलेला सत्तासंघर्ष अखेर संपुष्टात आला असून, सभापतीपदी रवी रामराव पवार यांची अविरोध निवड झाली आहे. आज शुक्रवार (दि. ९ जानेवारी) रोजी दुपारी दोन वाजता ही निवड प्रक्रिया शांततेत पार पडली.
माजी सभापती गुलाबराव लोभा जाधव यांच्याविरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव १५–० अशा एकमताने मंजूर झाल्यानंतर बाजार समितीतील नेतृत्वबदल निश्चित झाला होता. हा ठराव महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ च्या कलम २३(अ) अंतर्गत मंजूर करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार घेण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत पीठासन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदान व निवड प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत सहकार अधिकारी पुसद केशव मस्के, एस. एस. पिंपरखेडे तसेच सहाय्यक लिपिक जे. बी. साळवे यांनी काम पाहिले.
महत्त्वाची बाब म्हणजे, सभापतीपदावरून पायउतार झाल्यानंतर माजी सभापती गुलाबराव जाधव हे या निवड प्रक्रियेत अनुपस्थित राहिले. त्यांच्यासह अन्य दोन संचालकही सभागृहात हजर नव्हते.
या सत्तांतरामागे राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट),भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तसेच ॲड. गजेंद्र देशमुख यांची असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. या तिघांच्या समन्वयामुळे बाजार समितीतील सत्तासमीकरण बदलले आणि शिंदे,शिवसेना समर्थित उमेदवार सभापतीपदी निवडून आला.निवड प्रक्रियेत सभापती रवी रामराव पवार यांच्यासह एकूण १५ संचालक उपस्थित होते. सर्व उपस्थित संचालकांनी एकमताने पाठिंबा दिल्याने निवड बिनविरोध झाली.
एकंदर पाहता, ही निवड केवळ सभापतीपदापुरती मर्यादित न राहता महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील पुढील राजकीय दिशा ठरवणारी ठरली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी व व्यापाऱ्यांच्या दृष्टीनेही आता स्थिर व मजबूत नेतृत्व मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
