महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सत्तासंघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. माजी सभापती गुलाबराव लोभा जाधव यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव १५–० अशा एकमताने मंजूर झाल्यानंतर, उद्या शुक्रवार (दि. ९ जानेवारी) रोजी दुपारी १ वाजता नव्या सभापतीची निवड होणार आहे. या निवडीकडे संपूर्ण महागाव तालुक्याचे लक्ष लागले आहे.
बाजार समितीच्या एकूण १८ संचालकांपैकी १५ संचालकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले.एकही मत विरोधात न पडल्यामुळे गुलाबराव जाधव यांना सभापतीपदा वरून पायउतार व्हावे लागले.
हा अविश्वास ठराव महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ च्या कलम २३(अ) अंतर्गत दाखल करण्यात आला होता. सभापतींवर संचालकांना विश्वासात न घेता निर्णय घेणे, बाजार समितीच्या आर्थिक हिताकडे दुर्लक्ष करणे, व्यापाऱ्यांना फायद्याचे निर्णय राबविणे तसेच बहुमताने मंजूर ठरावांची अंमलबजावणी न करणे, असे गंभीर आरोप करण्यात आले होते.
या वादाचे गांभीर्य तेव्हा स्पष्ट झाले होते, जेव्हा सर्व संचालक थेट विकास मीना यांच्या कार्यालयात दाखल झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली आणि पीठासन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया पार पडली.
अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर आता बाजार समितीच्या नव्या सभापतींची उद्या एक वाजता निवड प्रक्रिया पार पडणार असून सभापती पदासाठी रवी पवार यांचे नाव चर्चेत असून उद्याच्या सभापती निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या संदर्भात सुरवातीपासून लोकप्रिय न्यूज पोर्टल, लोकवेधने बाजार समितीच्या घटनाघडमोडी सविस्तरपणे मांडल्या असून उद्याच्या निवडी संदर्भातही पवार यांची सभापती पदी वर्णी लागण्याचे भाकीत खरे ठरणार की..वेळेवर यात काही बदल होतील याकडे जनता लक्ष वेधून आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उपसभापती बाळासाहेब करपे यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सभापतीपदाचा कार्यभार आहे.त्यामुळे उद्याची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर उपसभापती बाळासाहेब करपे हे आपल्या पदावर कायम राहणार असल्याची माहिती आहे.एकंदर पाहता, उद्याची सभापती निवड ही केवळ एका पदापुरती मर्यादित नसून, महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीची पुढील राजकीय दिशा ठरवणारी ठरणार आहे. या निकालाचा आगामी काळात होऊ घातलेल्या तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावर विपरीत परिणाम होणार असल्याची जनभावना आहे.