२४ वर्षांपूर्वीचा इतिहास पुन्हा जिवंत; उमरखेड नगरपरिषदेत जनशक्ती पॅनलचा पदग्रहण सोहळा संपन्न – महामंडळाच्या बसमधून सत्तेचा प्रवेश

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
उमरखेड :
उमरखेड शहराच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस निर्णायक आणि ऐतिहासिक ठरला. उमरखेड नगरपरिषदेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजश्री संतोष जैन यांनी अधिकृत सूत्रे स्वीकारली,तर जनशक्ती पॅनलच्या १७ नगरसेवकांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. नगरपरिषद इमारतीच्या प्रांगणात पार पडलेला हा पदग्रहण सोहळा केवळ औपचारिक न राहता, शहराच्या राजकारणात नवी दिशा देणारा ठरला.
या सोहळ्याला शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे स्थानिक व जिल्हास्तरीय नेते, तसेच नगरपरिषद प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरखेड शहर काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर अग्रवाल होते. यावेळी तातू देशमुख, रामदेव सरकर, साहेबराव कांबळे, ॲड. संतोष जैन, इनायतुल्ला जनाब, बाळासाहेब नाईक, ॲड. संजय जाधव, सतीश नाईक, गोपाल अग्रवाल, आत्माराम शिंदे, सुभाष दिवेकर, ॲड. बळीराम मुटकुळे, डॉ. अजय नरवाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पदग्रहणापूर्वी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर सर्वांचे लक्ष वेधून घेणारा आणि राजकीय संदेश देणारा विशेष प्रसंग घडला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व १७ नगरसेवक हे थेट महामंडळाच्या बसमधून पदग्रहण स्थळी दाखल झाले. ‘सत्ता ही जनतेसाठी आहे, जनतेपासून दूर नाही’ हा ठाम संदेश देणारी ही कृती शहरभर चर्चेचा विषय ठरली.
राजकीय निरीक्षकांच्या मते, हा सोहळा केवळ शपथविधी नसून उमरखेडच्या पुढील विकासाचा पाया रचणारा क्षण आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, नागरी सुविधा, पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
पदग्रहणानंतर बोलताना नगराध्यक्ष तेजश्री संतोष जैन म्हणाल्या,
नगरसेवक,प्रशासन आणि नागरिक यांना सोबत घेऊन उमरखेडच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करू. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
या ,आयोजित कार्यक्रमाचे ,कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.संतोष जैन यांनी केले.तर साहेबराव कांबळे यांच्यासह मान्यवरांनी नव्या नेतृत्वाला शुभेच्छा देत विकासाभिमुख कारभाराची अपेक्षा व्यक्त केली.
——————————————————————————-
विशेष म्हणजे, लोकवेध न्यूज पोर्टलने उमरखेड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान वास्तव आणि वस्तुनिष्ठ बातम्यांवर भर देत जनशक्ती पॅनल परिवर्तन घडवून आणेल, तसेच २४ वर्षांपूर्वीचा इतिहास पुन्हा घडेल, असे भाकीत केले होते. आजच्या पदग्रहण सोहळ्यात महामंडळाची बस सर्व नगरसेवकांना घेऊन नगरपरिषदेत दाखल झाल्याने त्या भाकीताची जणू प्रत्यक्षात पुनरावृत्ती झाल्याची चर्चा शहरभर रंगली असून, हाच या सोहळ्याचा सर्वात मोठा विशेष ठरला आहे.
