महागाव नगरपंचायतीचा काळा कारभार उघड ! घरकुल,स्ट्रीटलाइट,दारू परवाना महाघोटाळ्यांचा जनता दरबारात पर्दाफाश

 

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क 

महागाव :- 

महागाव शहरातील महागाव नगरपंचायत पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात सापडली आहे. शहरात आयोजित जनता दरबारात घरकुल योजना, स्ट्रीटलाइट, पाणीपुरवठा, बांधकाम परवाने तसेच देशी दारू भट्टीसाठी देण्यात येणाऱ्या नाहरकत प्रमाणपत्रांमध्ये (NOC) कथित गैरव्यवहार, अनियमितता व महाघोटाळ्यांचे आरोप पुराव्यांसह मांडण्यात आले. या जनता दरबाराला रामराव पाटील नरवाडे अध्यक्षस्थानी होते.

२०१५ साली यवतमाळ जिल्ह्यात महागावसह अनेक नगरपंचायती अस्तित्वात आल्यानंतर इतर शहरांमध्ये विकासकामांची गती दिसून आली. मात्र, महागाव शहर गेल्या दहा वर्षांत विकासाच्या बाबतीत पूर्णतः ठप्प असल्याचा थेट आरोप उपस्थित नगरसेवकांनी केला.या काळात सत्तेची सूत्रे कोणाच्या हातात होती आणि शहरासाठी प्रत्यक्षात कोणती कामे झाली ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

 

नगरपंचायतीची जागा विक्री : संशय अधिक गडद

⬛जानेवारी २०२५ मध्ये नगरपंचायतीच्या मालकीची जागा विक्री करण्यात आल्याचा गंभीर मुद्दा जनता दरबारात उपस्थित झाला.कोर्टात प्रकरण सुरू आहे,असे सांगून माहिती दडपली जात असल्याचा सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्यात आला. न्यायालयीन प्रकरण असतानाही पारदर्शक माहिती न दिल्याने या व्यवहारावर संशयाचे सावट अधिक गडद होत असल्याचे नगरसेविका सौ जयश्री संजय नरवाडे यांनी स्पष्ट केले.

 

प्रभाग क्रमांक १ मध्ये राजकीय दबाव टाकून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करण्यात आला.गरज नसताना कामे सुरू करून पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतरच ती घाईघाईने पूर्ण केली जात असल्याचे सांगण्यात आले. वायरिंग कामाचे बिल कधी काढले, याबाबत माहिती देण्यास नगरपंचायत टाळाटाळ करत असल्याचा आरोप जयश्री संजय नरवाडे यांनी केला.काम बोगस नसेल, तर माहिती लपवण्याचे कारण काय? असा थेट सवाल ही उपस्थित झाला.

 

⬛पाणीपुरवठा योजनेचा फज्जा

प्रत्येक प्रभागात बोरवेल असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात प्रभाग क्रमांक ११, १२ व १६ मध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याचे समोर आले. जुन्या गावातील अर्ध्या भागाला बोरवेलवरून पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप करण्यात आला. प्रभाग क्रमांक १२ मध्ये पाईपलाईन व कॉक दुरुस्तीसाठी नागरिकांना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

⬛स्ट्रीटलाइट घोटाळा : बिले काढली, दिवे नाहीत

शहरातील कोणत्याही प्रभागात पुरेशा प्रमाणात स्ट्रीटलाइट नसतानाही सर्व बिले आधीच काढण्यात आल्याचा आरोप झाला.कामाचा दर्जा निकृष्ट असून माहिती मागितल्यावर वेळकाढूपणा केला जात असल्याचेही सांगण्यात आले. वार्ड क्रमांक १६ मध्ये सिमेंट रपट्याचे काम करूनही त्याचे बिल न काढणे ही प्रशासनाची शोकांतिका असल्याचे मत व्यक्त झाले.

दरम्यान देशी दारू दुकानासाठी परवानगी देताना बोगस दस्तावेज तयार केल्याचा आरोप जनता दरबारात करण्यात आला.घरकुल योजनेंतर्गत मोठा घोटाळा झाल्याचा दावा करत अनेक लाभार्थ्यांना आजही बांधकाम परवाने मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. एका दिवसात दोन वेगवेगळ्या सीओंच्या सह्या दाखवण्यात आल्याने संशय अधिक बळावला आहे. नगरपंचायतीचे कर्मचारी मुजोर झाले असून, पैसे दिल्याशिवाय सामान्य नागरिकांचे काम होत नसल्याची गंभीर तक्रार करण्यात आली.

 

लाचखोरीचा थेट आरोप

प्रभाग क्रमांक १३ मधील सुरेश बाबाराव नरवाडे यांनी बांधकाम परवाना व अभियंत्याच्या सह्यांसाठी संबंधित लिपिकाने ५ हजार रुपये रोख घेतल्याचा आरोप केला. अभियंत्याच्या सह्याही बोगस असल्याचा दावा करत पुराव्यानिशी हे प्रकरण जनता दरबारात मांडण्यात आले.

 

⬛कचरा व्यवस्थापन कोलमडले

सहा महिन्यांपूर्वी कचरा उचलण्याचे टेंडर होऊनही शहरात कचऱ्याचा प्रश्न कायम आहे. नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, थकीत घरकुलाचे पैसे तात्काळ देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.नगरसेविका सौ. जयश्री संजय नरवाडे यांनी मी, सदैव महागावच्या नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. असे स्पष्ट मत व्यक्त केले. तर माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सुरेश उत्तमराव नरवाडे यांनी गरिबांची पिळवणूक थांबवण्याची जोरदार मागणी केली.

दरम्यान, ईश्वर अनिल संत व भास्कर गाडे यांच्या घरकुल फाईली गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला असून, पोलिसात तक्रार होऊनही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात आला. हा सर्व प्रकार सत्ताधाऱ्यांनी हेतुपुरस्सर केल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला.या,जनता दरबारामुळे महागाव नगरपंचायत व संबंधित कर्मचाऱ्यांच्या कारभारावर अधिक संशय बळावल्याचे अधिक स्पष्ट झाले आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने तात्काळ सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी उपस्थित नागरिकांनी सुद्धा केली.या आंदोलनात भारतीय जनता पार्टी शहराध्यक्षांसह अनेक पदाधिकारी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या