महागावात घरकुल राजकारण तापले ; सत्ताधाऱ्यांविरोधात आज जनता दरबारातून कथित घोटाळ्याचा भंडाफोड

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क

महागाव :

आवास योजनेअंतर्गत पात्र असूनही घरकुलाचा निधी न मिळालेल्या वंचित लाभार्थ्यांच्या प्रश्नावर आज महागावात थेट सत्ताधाऱ्यांविरोधात राजकीय रणशिंग फुंकले जाणार आहे. रविवार, दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता श्रीराम चौक, प्रभाग क्रमांक १२ येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असून, याच दरबारात घरकुल वाटपातील कथित घोटाळ्याचा पुराव्यानिशी भंडाफोड केला जाणार असल्याचा ठाम इशारा नगरसेविका जयश्री संजय नरवाडे यांनी दिला आहे.

महागाव नगरपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजनेचा मूळ उद्देश बाजूला सारून सत्ताधाऱ्यांच्या राजकीय स्वार्थासाठी योजनेचा गैरवापर करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. सत्ता मिळताच काही सत्ताधारी पदाधिकारी आणि त्यांच्या जवळच्या कार्यकर्ते,नातेवाईक व मर्जीतील काही कार्यकर्त्यांची बोगस पद्धतीने योजनेत नावे समाविष्ट करण्यात आली,तर खऱ्या गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. आगामी निवडणुकांत राजकीय फायदा मिळवण्यासाठी हा सारा प्रकार सुनियोजित कटाचा भाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महागाव नगरपंचायतीत मोठ्या प्रमाणावर बनावट घरकुल फाईल्स तयार करण्यात आल्याचा आरोप करत,नातेसंबंधातील लाभार्थ्यांच्या फाईल्सवर तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा गैरवापर करण्यात आल्याचा गंभीर दावा जयश्री नरवाडे यांनी केला आहे.हा जिल्ह्यातील घरकुल वाटप योजनेतील आतापर्यंतचा सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचे सांगत,या संपूर्ण प्रकरणाचे पुरावे जनता दरबारात उघड केले जातील,असे त्यांनी ठामपणे जाहीर केले.

दरम्यान, ज्यांना अद्याप प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी मिळालेला नाही, अशा सर्व पात्र वंचित लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आजच्या जनता दरबारात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.या दरबारात लाभार्थ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जाणार असून, कागदपत्रांची छाननी करून वंचितांसाठी संघटित आणि तीव्र लढा उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.महागाव नगरपंचायतीतील घरकुल वाटपातील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली असून,आजचा जनता दरबार सत्ताधाऱ्यांसाठी निर्णायक ठरणार का,याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या