उमरखेड–महागावमध्ये भाजपला दुहेरी धक्का नगरपरिषदेतील पराभवानंतर बाजार समितीतही सत्तेचा अंत; सभापती गुलाबराव जाधव पदच्युत

 

लोकवेध न्युज नेटवर्क 

महागाव : –

महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्तासंघर्षाचा आज निर्णायक शेवट झाला असून, हा निकाल केवळ प्रशासकीय नसून थेट राजकीय अर्थवाही ठरणारा आहे. सभापती गुलाबराव लोभा जाधव यांच्याविरोधात दाखल अविश्वास ठराव आज शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी १५–० ने एकमताने मंजूर झाला. विशेष सर्वसाधारण सभेत १८ पैकी तब्बल १५ संचालकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने, भाजपप्रणित सभापतींना पदावरून पायउतार व्हावे लागले. पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी सखाराम मुळे यांनी काम पाहिले.यावेळी एस एस पिंपरखेडे सहकार अधिकारी श्रेणी एक, बाजार समितीचे सचिव अभिजीत गुगळे यांची उपस्थिती होती.

समितीतील कारभारात मनमानी, संचालकांना विश्वासात न घेणे, आर्थिक निर्णयांतील पारदर्शकतेचा अभाव, मासिक सभेत चर्चा न करता परस्पर आदेश काढणे तसेच बहुमताने मंजूर ठरावांची अंमलबजावणी न करणे—या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर १५ डिसेंबर रोजी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. हा ठराव महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी–विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ च्या कलम २३(अ) अंतर्गत सादर करण्यात आला होता.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पीठासन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभेत वातावरण तणावपूर्ण होते. मात्र निकाल जाहीर होताच महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्तासमीकरण पूर्णतः उलटले.
दरम्यान,अविश्वास ठरावानंतर समितीच्या कारभाराची सूत्रे काँग्रेसचे उपसभापती बाळासाहेब करपे यांच्याकडे जाण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.अविश्वास ठरावास उपस्थित व पाठिंबा देणारे संचालक
रामेश्वर पांडूरंग करपे,गजेंद्र बाळासाहेब देशमुख, किशोर रंगराव देशमुख, वासुदेव उत्तमराव नेवारे, विनोद जगदेवराव राऊत, कृष्णराव रामराव राऊत, निरंजन किसन धनगर, रवि रामराव पवार, उकंडा सिताराम राठोड, पुंडलिक भिकाजी भुरके, परमेश्वर प्रकाश जाधव, विजय राजेश्वर कुष्णापूरे, रितेश मोहनलाल पुरोहित, विनोद बाळाजी भगत, सौ. पुष्पाताई सिताराम ठाकरे.

⬛उतरती कळा स्पष्ट

विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या उमरखेड नगरपरिषद निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजपच्या सभापतींचा पायउतार होणे—या दोन घटनांनी उमरखेड विधानसभा क्षेत्रात भाजपची पकड सैलावत असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.स्थानिक पातळीवरील सत्ता हातातून निसटत असल्याचे चित्र ठळकपणे पुढे आले असून,आगामी काळात या निकालाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

⬛विशेष म्हणजे, लोकवेधने आपल्या वृत्तांतातून आधीच हा कौल भाकीत केला होता.आणि आजचा निकाल त्या भाकीताला दुजोरा देणारा ठरला.महागाव बाजार समितीतील हे सत्तांतर तालुक्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारे ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या